भाजप आध्यात्मिक आघाडीचं तुळजाभवानी मंदिर परिसरात आंदोलन सुरू. - BJP spiritual front starts agitation in Tulja Bhavani temple area Curfew imposed as per section 144 | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आध्यात्मिक आघाडीचं तुळजाभवानी मंदिर परिसरात आंदोलन सुरू.

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरातील 300 मीटर परीघ परिसरात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले  आहे.

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्यातील मंदिर सुरु करावीत, या मागणीसाठी विविध संघटना, राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री 12 पासून ते पुढील 24 तास  तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरातील 300 मीटर परीघ परिसरात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. 

त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार मंदिर परिसरात घडू नये, यासाठी प्रशासनांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
 तुळजाभवानी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असल्याच चित्र सध्या पहायला मिळतं आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडप नगर परिषद प्रशासनानं रातोरात उखडून टाकला आहे. 

‘राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. मुख्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र लिहून त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही. मुख्यमंत्र्यांना साधू-संतांशी बोलायला वेळ नाही’, अशी टीका भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी केली आहे. काल राज्यभरातील साधू-महंतांच्या उपस्थितीत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारावर देवीची आरती केली. त्यानंतर राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

तुषार भोसले म्हणाले की प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी आज सकाळी रणचंडी यज्ञ व आंदोलन करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करताय मात्र त्याला बळी पडणार नाही , जोपर्यंत मंदिर खुले होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.  

या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत गुरुवारी भाजप आध्यात्मिक आघाडीकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं.  तुषार भोसले यांना पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली आहे.   

संबंधित लेख