तो एक फोन ...अन् 12 मंत्र्यांच्या धडाधड विकेट! - BJP President J P Nadda called 12 minister for resignation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

तो एक फोन ...अन् 12 मंत्र्यांच्या धडाधड विकेट!

मंगेश वैशंपायन
शुक्रवार, 9 जुलै 2021

अनेक मंत्र्यांना राजीनाम्याचा आदेश ऐकून त्याचे कारण विचारण्याचेही धाडस झाले नाही... 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना धक्कातंत्र फार आवडते. मिडियाला कोणत्याही परिस्थितीत माहिती होणार नाही, अशा गोपनीयतेने व्यक्ती नेमल्या जातात आणि काढल्याही जातात. दोन दिवासंपूर्वी म्हणजे सात जुलै रोजी असेच घडले.  दिल्लीतील भयानक उष्मा अंग जाळत असतानाच दुसरीकडे राजकीय वातावरणही तापले होते. (Modi Cabinet Expansion)

मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या घंटा घणाणू लागलेल्या होत्या. मोदी आपल्या टिममध्ये  कोणते नवे मंत्री घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. संभाव्य मंत्र्यांच्या बातमीपाठी धावणारा मिडीया अनेक नावे चालवत होता. पण या मंत्रीमंडळातून कोणाला नारळ मिळणार, याची गंधवार्ताही कोणाला नव्हती.

सात जुलैच्या दुपारी बाराच्या सुमारास हे आॅपरेशन सुरू होती. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे नेहरू मार्गावरील आपल्या बंगल्यातील एका खोलीतून एका मागोमाग एक फोन काॅल्सचा धडाका सुरू करतात. नंतरच्या एखाद दोन तासांत पानगळ व्हावी तसे हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक आदी 10 मंत्र्यांचे एकामागोमाग एक राजीनामे देण्याचे सत्र सुरू होते. यातीह काही नावे मिडियापर्यंत पोहोचतात. पण दोन नावे शेवटपर्यंत कळत नाही. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सायंकाळी सहा वाजता ठरलेला असतो. त्याच्या बरोबर अर्धा तास आधी राष्ट्रपती भवनातून प्रसिद्धपत्रक येते. त्यात बारा मंत्र्यांच्या राजीनामे स्वीकारल्याचे जाहीर केलेल होते.  यातील दोन नावे पाहून अनेकांना धक्का बसतो. रवीशंकर प्रसाद व प्रकाश जावडेकर या दोन हेवीवेट मंत्र्यांनीही राजीनामे दिल्याचा बातमीने राजकीय बाॅम्बगोळा आदळतो!

वाचा या बातम्या : प्रकाश जावडेकर, प्रसाद यांना हटविण्याची ही आहेत कारणे....

वैष्णव आणि दानवे यांच पटायचं कसं?

केदार आणि पटोले पावसात भिजले पण राऊत यांनी ढूंकूनही नाही पाहिले...

मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलांबाबत भाजपमधील सूत्रांकडून विलक्षण रोचक अशी माहिती मिळाली. पंतप्रधानांनी गेले दोन-तीन महिने विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा स्वतः आढावा घेतल्यावर गृहमंत्री अमित शहा, नड्डा व संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्याशी दीर्घ विचारविनिमय केला. कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या गैरव्यवस्थापनावर काही तरी सक्त उपाय केलाच पाहिजे, यावर चौघांचेही मतैक्य झालेले. `ब्रॅंड मोदी` वाचविण्यासाठी काही मंत्र्यांना डच्चू मिळणार, हे खरे ठरत चालले होते.

त्यानंतर काढल्या जाणाऱया मंत्र्यांची यादी तयार झाली. संबंधितांना, तुम्ही 7 जुलैला दिल्लीतच थांबावे असे निर्देश प्रथम दिले गेले. आता या मंत्र्यांना तुम्ही राजीनामा तातडीने धाडून द्यावा, इतक्या स्वच्छ शब्दांत पंतप्रधानांचा निरोप सांगणार कोण? तर स्वतः नड्डा यांनीच ही जबाबदारी उचलली. त्यांनी सर्वप्रथम जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांना दूरध्वनी करून एका वाक्यात स्पष्ट निरोप दिला. त्यानंतर निशंक, हर्षवर्धन, संजय धोत्रे, सदानंद गौडा, प्रताप सारंगी आदींना नड्डा यांनी असेच फोन केले. प्रत्येक फोन अवघ्या काही मिनिटांचा! राजीनामा द्या असा आदेश. त्यावर का, माझे काय चुकले, हे विचारण्याची यातील कोणाचीही प्रज्ञा नव्हती.  

या आदेशाने ज्यांच्यावर वीज कोसळली त्यांच्यापैकी बाबूल सुप्रियो यांच्यासारख्यांनी आपले दुःख जाहीरपणे व्यक्त केले. आपला विनाकारण राजीनामा घेतल्याचे त्यांनी निकटवर्तीयांना सांगितले. मात्र त्यातून मेसेज हा दिला गेला की सुप्रियो बंगालमध्ये दिदींच्या तृणमूल काॅंग्रेसच्या जवळ जायची धडपड करत आहेत. प्रसाद यांनी राजीनामा पाठविल्यावर काही क्षणांत आपल्या ट्विटर हॅंडलवरून मंत्री वगैरे उपनामे हटवून फक्त खासदार, पाटणा एवढाच उल्लेख ठेवला. आपल्यातील खासदाराचा पक्षही त्यांनी काढून टाकला. मंत्र्यांची खाती जाहीर झाल्यावर पीयूष गोयल यांना रेल्वेखाते काढून घेतल्याचे समजल्यावर त्यांनी काही फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे तातडीने बंद करा, असे त्यांना सक्तपणे बजावण्यात आल्याचे समजते...  अशा रितीने मोदी यांच्या आॅपरेशनची प्रत्यक्ष अंमलबजावणी सौम्य स्वभावाचे नड्डा यांनी केली.

दानवेंचे पद यामुळे वाचले...

ज्यां मंत्र्यांना नारळ द्यायचा त्या यादीत सुरवातीला रावसाहेब दानवे पाटील यांचेही नाव होते असे खात्रीलायकरीत्या कळते. मात्र ते हुशार निघाले. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना दानवे यांच्यासारख्या जनसंघापासूनच्या ज्येष्ठ मराठा पक्षनेत्यावर भाजपने हा अन्याय केला असा मेसेज यातून जाईल तेव्हा तुम्हीच बघा बुवा, असा संदेश त्यांच्या वतीने महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडे व्यवस्थितपणे पोहोचविला गेल्याचे समजते. तिकडून दिल्लीला फोनाफोनी झाली आणि... दुपार उलटता उलटता दानवे निर्धास्त झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख