मुंडे यांच्या घरासमोर घंटानाद कधी...भाजपचा सवाल... - bjp Mumbai Mahila Morcha criticizes NCP | Politics Marathi News - Sarkarnama

मुंडे यांच्या घरासमोर घंटानाद कधी...भाजपचा सवाल...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

नैतिकतेची चाड असेल तर मुंडे यांनी स्वतःच राजीनामा द्यावा, अशी  मागणी शीतल देसाई यांनी केली आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्रात घंटानाद करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आता मुंडे यांच्या घरासमोर कधी घंटानाद करणार, असा टोला भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महिला मोर्चाप्रमुख शीतल गंभीर देसाई यांनी लगावला आहे. बलात्कार प्रकरणी सामान्य गुन्हेगारांना लागणारा न्याय मंत्र्यांनाही लावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. 

सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे व लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यावर बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांचा राजीनामा न मागण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नगरसेविका असलेल्या शीतल देसाई यांनी मुंबई महिला मोर्चाची भूमिका मांडली आहे. 

बलात्काराच्या आरोपांमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना जो न्याय लावला जातो, तोच न्याय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनाही लावावा, बलात्काराच्या आरोपांमध्ये सर्वसामान्य व्यक्तीला लगेच अटक केली जाते. निदान गुन्हा नोंदवून चौकशी तरी सुरु होते, तोच न्याय सर्वत्र लावला जावा. येथे मंत्र्यावर आरोप असल्याने अपवाद केला जाऊ नये, याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने जरी मुंडे यांचा राजीनामा मागितला नसला तरी त्यांनी स्वतःच कायदा तोडल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेची चाड असेल तर मुंडे यांनी स्वतःच राजीनामा द्यावा, अशीही मागणी देसाई यांनी केली. 

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराविरोधात घंटानाद आंदोलन केले होते. आता या राष्ट्रवादी काँग्रेस महिला मुंडे यांच्या घरासमोर घंटानाद कधी करतात, याची सर्वसामान्य महिला वाट पहात आहेत, असा टोलाही देसाई यांनी लगावला. 

मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले असल्याने तपास यंत्रणेला निष्पक्षपणे व कोणाच्याही दडपणाशिवाय या आरोपांची चौकशी करता यावी, यासाठी मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. तरच या प्रकरणी तक्रारदारावर आणि साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव राहणार नाही व सत्य बाहेर येऊ शकेल. मुंडे हे मंत्री असताना पोलिस खऱ्या अर्थाने त्यांची चौकशी करूच शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा भाजप मुंबई महिला मोर्चातर्फे त्यांना जागे करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन केले जाईल, असा इशाराही देसाई यांनी दिला.

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख