शशी थरूर यांना 'भारतीय व्हेरियंट' भोवणार; खासदारकी रद्द करण्याची भाजपची मागणी - BJP MP writes to speaker to remove Shashi tharoor as a member of parliament | Politics Marathi News - Sarkarnama

शशी थरूर यांना 'भारतीय व्हेरियंट' भोवणार; खासदारकी रद्द करण्याची भाजपची मागणी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 25 मे 2021

शरूर यांनी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाबाबतही ट्विट केलं होतं.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे नवीन प्रकार कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. या नवी प्रकाराला B.1.167 हे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. या व्हेरियंटमुळं संसर्ग वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट झालं आहे. हा व्हेरिंयंट पहिल्यांदा भारतात आढळून आल्यानंतर अन्य काही देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले. काँग्रेससह अन्य काही पक्षाच्या नेत्यांनी या व्हेरियंटचे 'भारतीय व्हेरियंट' नामकरण करून मोदी सरकारला टोला लगावला आहे. (BJP MP writes to speaker to remove Shashi tharoor as a member of parliament)

भारतीय व्हेरियंट म्हणणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचाही समावेश आहे. शरूर यांनी काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये भारतीय व्हेरियंट असा उल्लेख केला होता. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी शरूर यांनी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाबाबतही ट्विट केलं होतं. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी जाहीर माफीही मागितली. पण थरूर यांच्या या काही ट्विटवरून भाजप आक्रमक झाली आहे. 

हेही वाचा : उरले फक्त बारा तास! यास चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार

भाजपेच खासदार निशिकांत दुबे यांनी थरूर यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. दुबे यांनी पत्र लिहिले असून त्यामध्ये भारतीय व्हेरियंट सुमित्रा महाजन यांच्या निधनाचे चुकीचे ट्विट तसेच टूलकिट प्रकरणातील थरूर यांच्या भूमिकेचा उल्लेख करण्यात आला आहे. थरूर यांच्या भूमिकेमुळं भारतीय संसद आणि सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळं त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्ट नुसार थरूर यांनी केलेला प्रकार पाहता त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार लोकसभाध्यक्षांनी बजावायला हवा. जागतिक आरोग्य संघटनाही नव्या व्हेरियंटला बी.1.167 असे म्हणते. पण भारतीय खासदारच अवैज्ञानिक शब्द वापरून देशाचा अपमान करण्यास धजावतात. सर्व समाज माध्यमांवर भारतीय व्हेरियंट हा शब्द हटविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तरीही थरूर यांनी जाणीवपूर्वक तो शब्द वापरला, असे पत्रात म्हटले आहे.

स्थायी समिती ही मिनी पार्लमेंट असते. मात्र थरूर यांनी समितीला विस्तारित काँग्रेसचे स्वरूप दिलं आहे. देशाच्या अजेंड्यापेक्षा राहूल गांधी यांच्या अजेंड्याबद्दल त्यांना जास्त काळजी वाटते. टूलकिट प्रकरणात थरूर माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडून खुलासा मागतात, हे आश्चर्यकारक आहे. एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू असताना संसदीय समितीचे सदस्य जाहीरपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळं थरूर यांनी घटनात्मक नियमांचा भंग केला आहे, असा आरोप दुबे यांनी पत्रात केला आहे. 

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख