भामरे म्हणतात, कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकीचाच असून, बंदी 3 ते 4 दिवसांत उठणार - bjp mp subhash bhamre said onion export ban decision was wrong | Politics Marathi News - Sarkarnama

भामरे म्हणतात, कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकीचाच असून, बंदी 3 ते 4 दिवसांत उठणार

मंगेश वैशंपायन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरुन महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचा घरचा आहेर सरकारला दिला आहे. 
 

नवी दिल्ली : येत्या 3-4 दिवसांत कांदा निर्यातबंदी उठविल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर होईल, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री व धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिली. कांद्याची अचानक निर्यातबंदी करण्याचा निर्णय चुकीचाच होता, असा घरचा आहेरही त्यांनी मोदी सरकारला दिला आहे. दरम्यान, निर्यातबंदीच्या निर्णयामुळे बांगलादेशाच्या सीमेवर तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) व चेन्नई बंदरांवर अडकून पडलेल्या हजारो टन कांद्याच्या निर्यातीला सरकारने परवानगी दिली असून, याबाबत वाणिज्य मंत्रालयाने काल रात्री आदेश काढल्याचे दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले. 

राज्यातील कांदा उत्पादकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली होती. असे अचानक निर्णय घेतल्याने एक भरवशाचा निर्यातदार देश अशी जी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आहे तिला धक्का बसतो, असे त्यांनी गोयल यांना स्पष्टपणे बजावले होते. ताज्या निर्णयाचा फायदा दुसऱ्यातिसऱ्या कोणाला नव्हे तर पाकिस्तान व अन्य कांदा उत्पादकांना होईल, हेही त्यांनी गोयल यांच्या लक्षात आणून दिले होते. 

केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय धक्कातंत्राने जाहीर केल्यावर राज्याच्या कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. या संतापाची धग याच पट्ट्यातील भामरे व भारती पवार या दोन डॉक्‍टर खासदारांनाही जाणवू लागली. पवार -गोयल भेट झाली त्याच दिवशी डॉ. पवार व डॉ. भामरे यांनीही गोयल यांची भेट घेऊन निर्यातबंदीचा फेरविचार करण्याचे साकडे घातले होते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. भामरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना निर्यातबंदी अंशतः का होईना उठेल असे सांगितले आहे.  

एका वृत्तवाहिनीशी बोलताना भामरे म्हणाले की, कांदा निर्यातबंदी अचानक लागू केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान काहीसे भरून निघेल अशा आशेत शेतकरी असतानाच अचानक कांदा निर्यातबंदी  झाली. या चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादकांना बसला. त्यांची अस्वस्थता लक्षात घेऊन गोयल यांना मी व डॉ. भारती पवार भेटलो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या काही दिवसांत सारी निर्यातबंदी उठेल, अशी आशा आहे. 

कांद्याची अचानक निर्यातबंदी करण्याचा निर्णय चुकीचाच होता, अशी भूमिका घेऊन डॉ. भामरे यांनी स्वपक्षीय सरकारलाच घरचा आहेर दिला. ते म्हणाले की, येत्या 3-4 दिवसांत कांदा निर्यातबंदी संपूर्ण मागे घेण्याची सुवार्ता मिळेल अशी मला खात्री आहे. सध्या बांगलादेशच्या सीमेवर अडकलेल्या व निर्यातीच्या मार्गावर असलेला कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याबद्दल गोयल यांचे मी आभार मानतो. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख