"शिवसेनेला जनता पाताळात गाडेल.." अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका - BJP MLA Atul Bhatkhalkar's reply to Shiv Sena Let change power in 2022 | Politics Marathi News - Sarkarnama

"शिवसेनेला जनता पाताळात गाडेल.." अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मिरवलेले हिंदुहृदयसम्राट हे बिरुद सत्तेच्या सोयीसाठी नाकारणाऱ्या शिवसेनेला जनता पाताळात गाडेल, 2022 मध्ये त्याची सुरुवात होणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही १०५ मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे, असे आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलेलं आहे. 

यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याबाबत भातखळकर यांनी टि्वट केलं आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "महापालिकेवरून भगवा उतरणार नाही या सामानातल्या भावनेशी मी सहमत आहे. फरक एवढाच की यावेळी भाजपाचा भगवा फडकेल. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मिरवलेले हिंदुहृदयसम्राट हे बिरुद सत्तेच्या सोयीसाठी नाकारणाऱ्या शिवसेनेला जनता पाताळात गाडेल, 2022 मध्ये त्याची सुरुवात होणार आहे." 

आगामी मुंबई महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर भगवाच फडकेल, पण तो भाजपचा असेल. 2022 मध्ये सत्ता बदलून टाकू. मागील वेळीही सत्ता बदलली असतील, पण दोस्तीत दिली. आता नाही. भाजप प्रत्येक प्रभागात नियोजन करून सत्तांतर करू, भाजपचाच भगवा फडकू, असा विशवास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला आहे.  

फडणवीस म्हणाले, की 'राजाचा जीव पोपटामध्ये, काही लोकांचा जीव मुंबई महापालिकेमध्ये.' अशी अवस्था आहे. त्यामुळे भ्रष्ट्राचाराचा आगार असलेली ही महापालिकेची सत्ता 2022 मध्ये बदलून टाकू. त्या वेळीही बदलू शकलो असतो, दोस्तीत ती दिली. पण आता नाही. आता भाजप प्रत्येक वार्डात, बुथमध्ये सत्तांतर करेल. प्रत्येक वार्डात एक नेता द्या, बुथमध्ये राजकीय कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. त्यांना राजकारण समजले पाहिजे. माझे युवा मोर्चाला आव्हान आहे, त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान 50 युवा कार्यकर्त्यांशी संपर्क केलाच पाहिजे.

फडणवीस म्हणाले, की महिला मोर्चाला विनंती आहे, की प्रत्येक बुथमध्ये किमान 100 घरातील महिलांशी संपर्क केलाच पाहिजे. बुथ कमिटीनेही 100 घरांपर्यंत पोहचून त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आता `मॅन टू मॅन` पोहचावे लागेल. मला वाटलं होतं, की सत्ता मिळाल्यानंतर काहीतरी चांगले होईल, पण त्यांच्या डोक्यात सत्ता गेली, त्यांचे पतन निश्चित आहे. वर्ष व्हायच्या आत त्यांना सत्तेचा माज झळकतो आहे. हा माज तोडावाच लागेल. जनतेचा विचार करणारे लोक सत्तेवर आणावेच लागेल. मला विश्वास आहे, की भाजपची नवीन टीम फळी तयार करील 2022 साली मुंबई महापालिकेवर भगवाच फडकेल, पण भाजपचा. कुठलीही विचारांची मिसळ नसलेला असेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख