'युवराजां'च्या हट्टापायी शिक्षणाचा बट्याबोळ...  भातखळकर यांचा आरोप - BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

'युवराजां'च्या हट्टापायी शिक्षणाचा बट्याबोळ...  भातखळकर यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

उदय सामंत हे मागे कुलगुरूंच्या बाबतीत खोटे बोलले व आता त्यांनी कुलगुरूंनाच अनभिज्ञ ठेवले आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई : युवराजांचा अहंकार जपण्यासाठी अंतिम वर्षाच्या थातुरमातुर परिक्षा घेण्याचे नाटक होत आहे. शिक्षणाचा पुरता बट्याबोळ करण्याचा उद्योग युवराजांच्या हट्टापाई सुरु आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने नाइलाजाने घेतला. परंतु हा निर्णय बेकायदा प्रकारे घेतला आहे.

परीक्षा अहवालातील शिफारसींबाबत कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेण्याचे नाटक केले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मागे कुलगुरूंच्या बाबतीत खोटे बोलले व आता त्यांनी कुलगुरूंनाच अनभिज्ञ ठेवले आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. 

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याकरीता बोलावलेल्या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी समितीच्या अहवालातील शिफारसी माध्यमांसमोर जाहीर केल्या. यात घरबसल्या परीक्षा देण्याची मुभा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या शिफारशींचा निर्णयच झाला नसल्याची बाब समोर आली आहे. कुलगुरूंना देण्यात आलेल्या पत्रांमध्येसुद्धा घरबसल्या परीक्षा देण्याचा उल्लेख नसल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे एकंदरीतच उच्च शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग युवराजांच्या हट्टापायीच चालू आहे. त्यामुळे यासंदर्भात आपण कुलपती म्हणून राज्यपालांकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची तक्रार केली आहे, असे भातखळकर म्हणाले. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारावरच परीक्षा व्हाव्यात, अशी मागणी सुद्धा आपण राज्यपालांकडे केल्याचेही ते म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख