मनाने भरकटलेल्या ट्रम्पप्रमाणेच महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्याचं वागणं.. . - BJP leaders in Maharashtra have started behaving like the wandering Trump | Politics Marathi News - Sarkarnama

मनाने भरकटलेल्या ट्रम्पप्रमाणेच महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्याचं वागणं.. .

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजपवर करण्यात आली आहे. 

मुंबई :  राजकारणात देशाचे वाटोळे होऊ नये, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा सदोष मनुष्यवध घडू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा. मनुष्यवधास जबाबदार असणाऱयांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजपवर करण्यात आली आहे. 

अमित शहा, मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही. ही ‘ट्रम्प’ संस्कृती हिंदुस्थानात कोणी रुजवत असेल तर त्यांनी अमेरिकेत सुरू झालेल्या अराजकाकडे डोळसपणे पाहायला हवे. तसे अराजक कोणाला हिंदुस्थानात हवे आहे काय, असा प्रश्न अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 

आत्महत्येस प्रवृत्त करणे व त्यातून आत्महत्या घडणे हा एक प्रकारे सदोष मनुष्यवधासारखाच गुन्हा आहे. असा गुन्हा करणारी व्यक्ती लहान असो की मोठी, त्याच्यावर कायद्याने कारवाई व्हायलाच हवी, पण भारतीय जनता पक्षाला असे कायद्याचे राज्य मान्य नाही मुळात त्यांना कायदाच मान्य नाही असे भरकटलेले वर्तन ते करीत आहेत. महाराष्ट्रात 2018 साली एका माय-लेकरांनी आत्महत्या केली. तत्कालीन सरकारने ते प्रकरण दडपले. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीस पकडले व त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना भाजपचे पुढारी वेडेखुळेच बनले, अशी टीका 'सामना'त करण्यात आली आहे. 

आज सदोष मनुष्यवधप्रकरणी सरकारवर, ज्यांचा मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर अश्लाघ्य चिखलफेक करणाऱ्या टोळ्य़ांनी याचे भान राखले नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्या बाबतीत घडले त्याची पुनरावृत्ती हिंदुस्थानात घडायला वेळ लागणार नाही. भाजपवाल्यांचे डोके इतके कामातून गेले आहे की, दिल्लीच्या रस्त्यांवर श्री. उद्धव ठाकरे व इंदिरा गांधी यांची पोस्टर्स चिकटवून आणीबाणीची आठवण लोकांना करून दिली जात आहे. हा बालिशपणा तर आहेच, पण अज्ञानसुद्धा आहे, असे अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात..

ते म्हणतात, जोपर्यंत सदोष मनुष्यवधातले ‘महात्मा’ सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे दंडास काळय़ा फिती लावून काम करू. हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे. नशीब की, याप्रश्नी भाजपने राज्यव्यापी जेल भरो, साखळी उपोषणे यांसारखे प्रयोग सुरू केलेले नाहीत. 

मनाने भरकटलेले प्रे. ट्रम्प अमेरिकेत जसे वागत आहेत तसेच ‘डिट्टो’ महाराष्ट्रातील भाजप पुढारी वागू लागले आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होताना दिसत आहेत, पण ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बसून दादागिरीची भाषा सुरू केली आहे. 

तद्दन खोटय़ा बातम्या पसरवून पदाची नाचक्की करत आहेत. कधी मतमोजणी थांबवा असा त्यांचा कांगावा असतो, तर कधी न्यायालयात जाऊन निर्णयास स्थगिती देण्याची मागणी करीत आहेत. ट्रम्प यांनीही त्यांच्या सशस्त्र् ‘रिपब्लिकन’ समर्थकांना रस्त्यांवर उतरवून गोंधळ आणि हिंसाचार सुरू केला आहे. ट्रम्प यांचे जे वर्तन आहे ते कायद्यास व अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या प्रतिष्ठेस धरून नाही.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख