...म्हणून राहुल गांधींनी सभा रद्द केल्या! भाजप नेत्यांनी सांगितले कारण - Bjp leaders criticise Rahul Gandhi over his dicision on election rallies | Politics Marathi News - Sarkarnama

...म्हणून राहुल गांधींनी सभा रद्द केल्या! भाजप नेत्यांनी सांगितले कारण

वृत्तसंस्था
रविवार, 18 एप्रिल 2021

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगात वाढत चालला असून एका दिवसातील नवीन रुग्णांचा आकडा अडीच लाखांच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी बंगालमधील निवडणूक प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक करून संपवावा, असे आवाहन केले आहे. मात्र, बंगालमधील निवडणूक प्रचारांमध्ये होत असलेल्या गर्दीवर ते बोलत नसल्याची टीका सोशल मीडियावर सुरू आहे. पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा, रोड शोला मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे बंगालमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नुकत्याच दोन सभा घेतल्या. पण आज त्यांनी पुढील सर्व सभा रद्द करण्याची घोषणा केली आहे.

त्यावरून भाजपने त्यांना खोचक टोला लगावला आहे. राहुल यांच्या सभांना गर्दीच होत नसल्याने त्यांनी सभा रद्द केल्याचा दावा भाजपन नेत्यांनी केला आहे. बंगालमधील भाजप नेते शिशिर बाजोरिया म्हणाले, काँग्रेस निवडणुकीत दिसत होती का? राहुल बंगालमध्ये केवळ पाचव्या टप्प्यात आले. कोरोना हे वास्तव आहे. म्हणूनच आम्ही सभांना येणाऱ्या लोकांना मास्क आणि सॅनिटायजर देत आहोत.

कर्नाटक भाजपचे नेते सीटी रवी यांनीही राहुल यांच्यावर निशाणा साधला. ''प्रिय राहुल गांधी. तुम्ही तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये प्रचार केला. कारण तुम्हाला तिथे थोडीफार आशा आहे. पण बंगालमध्ये तुम्ही कमी प्रचार केला. आपल्या सभांना लोकच येत नाही, म्हणून सभा रद्द केल्याचे तुम्ही जनतेला का सांगत नाही,'' असे ट्विट रवी यांनी केले आहे.

दरम्यान, बंगालमधील प्रचार सभा व रोड शोला होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निवडणुकीतील पुढील टप्प्यांतील मतदान एकाच दिवशी घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला केले आहे. पण त्यावर आयोगाकडून असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भाजपकडून निवडणुकीमुळे कोरोना वाढत नसल्याचा दावा आयोगाकडे केला आहे. ठरलेल्या तारखांनाच मतदान घेण्यात यावे, असे पत्र भाजपकडून आयोगाला देण्यात आले आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख