पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्र्याला हाकला...शक्ती कायदा काय चाटायचा..? - BJP leader Nitesh Rane criticizes the government | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्र्याला हाकला...शक्ती कायदा काय चाटायचा..?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

शक्ती कायदा ...काय चाटायचा आम्ही ? असे संतप्त ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

पिंपरी : जे दिशाबरोबर (आत्महत्या केलेली अभिनेता सुशांतसिंहची पीए) झाले, तेच पूजाबरोबर (पुण्यात आत्महत्या केलेली बीडची तरुणी) होणार असेल, तर तो शक्ती कायदा ...काय चाटायचा आम्ही ? असे संतप्त ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे. तर पूजा आत्महत्येत नाव घेण्यात येत असलेल्या मंत्र्याला हाकला, घरी पाठवा; चौकशी होत राहील, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. एकूणच पूजा आत्महत्येवरून राणे बंधू आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

राज्य मंत्रीमंडळातील वनमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांच्यामूळे पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. त्यामुळे त्यांचे नाव घेत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी,तर राठोड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही संतुलीत प्रतिक्रिया या घटनेवर आल्या आहेत. मात्र, कट्टर वैरी शिवसेनेच्या मंत्र्यावर या प्रकरणात आरोप झाल्याने राणे बंधू प्रचंड आक्रमक झाले आहेत. महिलांवरील अत्याचार रोखून ते करणाऱ्यांना पंधरा दिवसांत शिक्षा देणारा शक्ती कायदा राज्य सरकारने आणला आहे. मात्र, दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणानंतर पुण्यात पूजानेही आत्महत्या केल्याने या कायद्यावरच नितेश राणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट उद्विग्नपणे करीत मग, हा कायदा चाटायचा आहे का अशी विचारणा केली आहे.
 
तर, पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्र्याची हकालपट्टी करा, चौकशी, तर  होत राहील, असे वक्तव्य नीलेश राणे यांनी केले आहे. पूजा आत्महत्या प्रकरणानंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज, तर समजतो ना?… का तुमच्या मंत्र्याचा आवाजही तुम्हाला माहीत नाही?…  बाहेर काढा त्यांना… का खतपाणी घालताय ? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा वेळ केवळ आणि केवळ गुन्ह्यांमध्ये चाललाय. यापूर्वीही एका मंत्र्याने इंजीनियरला घरी नेऊन मारहाण केली आहे. त्याचे सीसीटीव्ही फूटेज असतानाही इंजिनीअरला मारहाण करणाऱ्या जितेंद्र आव्हाड या मंत्र्याचे नावच एफआयआरमध्ये नाही ? मारहाण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घाणेरड्या लोकांना खतपाणी घातलं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींवर आरोप झाले, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना तातडीने मुख्यमंत्रीपदावरून काढलं आणि नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं होतं, असे नीलेश म्हणाले. 

‘पोरं लपवा, बायका लपवा’ हे काय आम्ही सांगितलं होतं ? सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली. दुसरं लग्न लपवलं. त्यांची आमदारकी रद्द झाली की नाही? ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख