बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी..राणेंचा शिवसेनेला टोला - bjp leader Nitesh Rane Criticize On Uddhav Thackeray Aurangabad Rename Issue | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी..राणेंचा शिवसेनेला टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता नव्या वाद निर्माण झाला आहे.

मुंबई : औरंगाबाद शहरात प्रमुख चौकांमध्ये लव्ह औरंगाबाद,लव्ह खडकी, लव्ह प्रतिष्ठान,असे डिस्प्ले बोर्ड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आले आहेत. याशिवाय महापालिकेच्या काही जागा खाजगी संस्थांना देखील सुशोभीकरणासाठी देण्यात आल्या आहेत. परंतु या डिस्प्ले बोर्ड आणि सेल्फी पॉईंटवरून वेगळेच राजकारण सुरू झाले आहे.

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्यावरून राजकारण तापले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औरंगाबाद शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.

महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता नव्या वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. याबाबत नितेश राणे यांनी टि्वट केले आहे. आपल्या टि्वटमध्ये राणे म्हणतात, ''काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू..बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी! संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची.''

औरंगाबाद शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी या हेतूने स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून शहरात वादंग निर्माण होत आहे. औरंगाबाद शहराच्या इतिहासकालीन नावांची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून शहरात नुकताच राडा झाला होता. छावणी भागातील नेहरूपुतळ्या जवळ लावलेला `लव्ह औरंगाबादचा`, डिजिटल बोर्ड अज्ञातांनी रात्री फोडून टाकला. 

शिवसेनेने 'लव्ह औरंगाबाद', 'सुपर संभाजीनगर',चा डिस्प्ले बोर्ड टीव्ही सेंटर भागात लावून प्रतिउत्तर दिले आहे. यावरून एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी नुकताच शिवसेनेवर निशाणा साधला होता. महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून नेहमीच संभाजीनगरचा वापर राजकारणासाठी केला जातो असा आरोप त्यांनी केला होता. यावरून शिवसेना विरुद्ध एमआयएम असा कलगीतुरा रंगलेला असतानाच छावणी भागातील नेहरू पुतळ्याजवळ लावण्यात आलेला लव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी काही फोडला होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख