"राहुल गांधींना राजकारणात बरच शिकावं लागेल..." राणेंचा टोला - BJP leader Nilesh Rane told Congress leader Rahul Gandhi that there is a lot to learn in politics. | Politics Marathi News - Sarkarnama

"राहुल गांधींना राजकारणात बरच शिकावं लागेल..." राणेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

भाजपसमोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक येथील निवडणुकीने दाखवून दिले आहे, असे राणे म्हणाले.

मुंबई : बिहार निवडणुकीत भाजप - जेडीयूच्या एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे याचं खापर भाजपचे नेते निलेश राणे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर फोडले आहे. भाजपसमोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक येथील निवडणुकीने दाखवून दिले आहे, असे राणे म्हणाले. याबाबत निलेश राणे यांनी टि्वट केलं आहे.  

आपल्या टि्वटमध्ये राणे म्हणतात, "राहुल गांधींना राजकारणात बरच शिकावं लागेल. भाजप समोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक येथील निवडणुकीने निवडणुकीने दाखवून दिले आहे. राहुल गांधींनी त्यांच्या नेहमीच्या 15 मिनिटांच्या भाषणामध्ये 12 मिनिटं फक्त मोदी साहेबांची बदनामी केली. ही बदनामी कोणाला पचत नाही आणि पटतही नाही."

शिवसेनेचं केलं अभिनंदन...
बिहार निवडणुकीच्या निकालावरून भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे बिहार विधानसभेत शिवसेनेला कोणत्या मतदारसंघात किती मते मिळाली, याची आकडेवारी निलेश राणे यांनी टि्वट केली आहे. "वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन..." अशी खोचक टीका राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही, कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करेल ही आम्हाला खात्री आहे, असे टि्वट राणे यांनी केलं आहे. "शिवसेनेनं स्वत:चा कचरा करुन घेतला आहे. बिहारमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची परिस्थिती जशी झालीय तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल,"  असंही निलेश राणे म्हणाले. 

बिहार निवडणुकीत भाजप - जेडीयूच्या एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "एमआयएम- डेमाॅक्रेटिक फ्रंट ने मते खाल्ली असे काँग्रेसचे म्हणणे असेल तर मते खाण्याची ही बाब राष्ट्रीय जनता दलालाही लागू होते. त्यांना लागू होत नसेल तर मग इतरांबाबत काँग्रेसने बोलू नये. गेल्या सभागृहात काँग्रेसचे ३३ सदस्य होते. आता ही संख्या २० वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसने आपले चारित्र्य पहावे," 

आंबेडकर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू आणि इमेज चालली नाही, हे बिहारच्या निवडणुकीवरुन दिसते आहे. अन्य राज्यांत या आधी जे यश मिळाले ते बिहारच्या निवडणुकीत झालेले नाही.  चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला किती परिणाम झाला हे मतांची आकडेवारी आल्यावर बोलता येईल. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक याचिकांच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालय नेमण्यास सांगितले आहे.  अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपल्यावरच्या गुन्ह्यांबाबतची प्रतिज्ञापत्रे सादर केलेली नाही. त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का हा प्रश्न आहे,"
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख