आदित्य ठाकरे बालिश..मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा... - bjp leader kirit somaiya criticized on cm and aditya thackeray  | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरे बालिश..मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पयर्टन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवून परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पयर्टन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 
 
'आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, हे खरं आहे.' अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. यावर खोचक टीका सोमय्या यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करण्यापेक्षा न्यायालयात बोलायचं होतं. ते बालिश आहेत, अशा शब्दांत टीका किरीट सोमाय्या यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही विकासकामात अडथळा आणू नये असं स्पष्ट मत मांडलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात सरकार आहे. या निर्णय़ामुळे मेट्रो तीनच्या कामाला ब्रेक लागला आहे. अगोदरच रखडलेले कारशेडचे काम आता दोन महिने पूर्ण ठप्पच होणार आहे. पुढेही ते न्यायालयीन प्रक्रियेतच अडकून राहणार असल्याने एकूणच मेट्रो विस्तार प्रकल्प आणखी रेंगाळणार आहे. दरम्यान, या निर्णयाने भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.  

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी या निर्णयानंतर लगेचच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आरेतील कारशेड कांजूरला हलवून तेथे करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला जबाबदार कोण अशी विचारणाही त्यांनी केली. तर, अहंकाराने राज्य चालवता येत नसते, असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या निर्णयानंतर लगावला. 

आरेतील कारशेडच्या कामावर शंभर कोटी,तर कांजूरला पन्नास कोटी रुपये खर्च झाल्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले होते. हे कारशेड हलवल्याने पाचशे कोटीचा फटका बसणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे.

सुप्रीम कोर्टाने आरेच्या जागेला परवानगी दिली होती. तर कांजुरमार्गाचा राज्य सरकारचा अट्टाहास का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मेट्रोपासून मुंबईकरांना दूर ठेवण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे. 2024 पर्यंत मेट्रोचे काम लांबणीवर पडणार आहे. मनात येईल तसं काम ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. 

फडणवीस म्हणाले की सरकारनं अहंकारासाठी कांजूरमार्गमध्ये कारशेडचे आदेश दिलं होते. ते बेकायदेशीर आदेश होते. आता सरकारनं आरेमध्ये कारशेडचं काम सुरू करावं. विकासकामात हार जीत नको, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख