भाजप नेत्याला मारहाण...22 शिवसैनिकांवर गुन्हा  - BJP leader beaten Crime against 22 Shiv Sainiks cm | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेत्याला मारहाण...22 शिवसैनिकांवर गुन्हा 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

शिवसेनेचे शहर प्रमुख रवी मुळेंसह इतर 20 ते 22 जणांविरोधात शहर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख रवी मुळेंसह इतर 20 ते 22 जणांविरोधात शहर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ता. 5 फेब्रुवारी रोजी वीज वितरण कंपनीच्या विरोधात भाजपच्या वतीने आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी येथील शिवसैनिकांनी कटेकर यांच्या अंगावर शाई टाकून तोंडाला काळे फासून मारहाण देखील केली होती.

या घटनेची भाजप नेते किरीट सोमया, आमदार राम कदम यांनी दखल घेवून मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काल रात्री उशिरा शिवसेनेचे शहर प्रमुख रवी मुळे, संदीप केंदळे, सुधीर अभंगराव यांच्यासह इतर 20 ते 22 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे पंढरपूर शहराध्यक्ष रवी मुळे यांनी फिर्याद दिली होती 

दरम्यान, शिरीष कटेकर यांच्या अंगावर काळी शाई टाकून व तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी त्यांना चोपही दिला होता. त्या घटनेनंतर कटेकर यांना उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

भारतीय जनता पक्षाने आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. 5 फेब्रुवारी) कोरोना काळातील वाढीव वीजबील माफीच्या मागणीसाठी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष कटेकर यांनी भाषण केले होते. त्यांनी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची व्हीडीओ क्‍लिप शनिवारी (ता. 6 फेब्रुवारी) समाज माध्यमात व्हायरल झाली होती. त्याचे पडसाद पंढरपूर शहर व तालुक्‍यात उमटले होते. त्यातूनच शनिवारी (ता. 6 फेब्रुवारी) सायंकाळी शिरीष कटेकर यांच्या अंगावर काळी शाई टाकून व तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी चांगलाच चोपही दिला होता. या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे पंढरपूर शहराध्यक्ष रवी मुळे, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जयवंत माने, सुधीर अभंगराव, संदीप केंदळे, सिध्देश्वर कोरे यांनी पंढरपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांची भेट घेवून वादग्रस्त वक्तव्य करून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी शिरीष कटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे लेखी निवेदन दिले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख