..तुम्ही अजान स्पर्धांची काळजी करा..भातखळकरांनी शिवसेनेला डिवचलं.. - bjp leader atul bhatkhalkar attack on shivsena over ram temple issue | Politics Marathi News - Sarkarnama

..तुम्ही अजान स्पर्धांची काळजी करा..भातखळकरांनी शिवसेनेला डिवचलं..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 डिसेंबर 2020

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टि्वट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई :  'अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे ? यावरून राजकारण तापले आहे. आजच्या 'सामना'च्या संपादकीयमधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे,' अशी टीका 'सामना'तून भाजपवर करण्यात आली आहे.

भाजचे नेते आशिष शेलार, निलेश राणे यांनी या टीकेच्या समाचार घेतला आहे. शेलार यांनी अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? यावरून शिवसेनेवर धारेवर धरलं आहे. 'मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे,' असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टि्वट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको! तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा..."असे टि्वट करून भातखळकरांनी शिवसेनेला डिवचलं आहे.  

आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, "लाज सोडली शिवसेनेने...शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतात मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा."

अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे.  निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे, अशी टीका आजच्या सामनाच्या संपादकीय मधून भाजपवर करण्यात आली आहे. 

चार लाख स्वयंसेवक वर्गणीसाठी दारोदार फिरतील. हे स्वयंसेवक नक्की कोण? त्यांना कोणी नेमले आहे? मंदिरनिर्माणाचा खर्च साधारण 300 कोटींच्या घरात आहे. मुख्यमंत्री योगी यांनी राममंदिर बांधकामात निधीची चिंता करू नये, असे बजावले आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाचे मंदिर हे देशाच्या अस्मितेचे मंदिर आहे व त्यासाठी जगभरातील हिंदुत्ववाद्यांनी आधीच खजिना रिकामा केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य करणार? असा प्रश्न अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख