दीदी, भाजपमध्ये जाऊन चुक केली...मला परत घ्या...तुमच्याशिवाय जगू शकत नाही! - BJP Leader and Former TMC MLA Sonali Guha wants to return in TMC | Politics Marathi News - Sarkarnama

दीदी, भाजपमध्ये जाऊन चुक केली...मला परत घ्या...तुमच्याशिवाय जगू शकत नाही!

वृत्तसंस्था
रविवार, 23 मे 2021

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक आमदारांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

कोलकता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक आमदारांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापैकी काहींना निवडणुकीत पराभव झाला. तसेच पुन्हा तृणमूलची सत्ता आली. पक्ष सोडताना बहुतेकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. पण ममतादीदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर काही नेत्यांना पुन्हा दीदींचा आश्रय हवा आहे.

तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या चारवेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांना पुन्हा तृणमूलमध्ये यायचे आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी ममतादीदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी दीदींची माफी मागितली असून पक्षात परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसं मीही तुमच्याशिवाय जगू शकत नाही. दीदी, मला माफ करा. तुम्ही मला माफ केलं नाही, तर मी जगू शकणार नाही. कृपया, मला परत घेऊन घ्या. उर्वरित आयुष्य तुमच्या सहवासात घालवायचं आहे,' असे गुहा यांनी पत्रात म्हटलं आहे. 

हेही वाचा : अॅालिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला हत्येप्रकरणात अटक

आपण बॅनर्जी यांच्या परिवारातील सदस्य असल्याचे गुहा सांगतात. पण तिकीट न मिळाल्याने त्या नाराज झाल्या होत्या. तसेच त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा एकही फोन आला नाही, त्यामुळे दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितलं होतं. शनिवारी दीदींना पत्र लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, दुभंगलेल्या मनानं मी हे पत्र लिहित आहे. भावनाविवश होऊन मी दुसऱ्या पक्षात जाण्याचा चुकीचा निर्णय घेतला. मी तिथं रमू शकत नाही,' असंही त्यांनी नमूद केलं आहे.

या पत्राविषयी माध्यमांशी बोलताना गुन्हा म्हणाल्या, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय चुकल्याची जाणीव मला झाली आहे. मला दीदींची बदनामी करण्यास सांगून माझा त्यांनी वापर केला. तिथं वेगळं असल्याची जाणीव होत आहे. आता पुढील आठवड्यात मी दीदींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहे, असे गुहा यांनी स्पष्ट केलं.

गुहा या चारवेळा आमदार राहिल्या आहेत. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी विधानसभेत तिकीट मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली नव्हती. पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. निवडणूक प्रचारातही त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासह अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करत ममतादीदींना झटका दिला होता. पण त्यानंतरही तृणमूलने मागील निवडणुकीच्यापेक्षा अधिक जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख