महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये भाजप बडे भैय्या !  - BJP is JDU's big brother in Bihar like Maharashtra! | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये भाजप बडे भैय्या ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्रात कधी काळी भाजप शिवसेनेचा लहान भाऊ होता. तो 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वामुळे मोठा भाऊ बनला. अर्थात महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आला. आता तसेच बिहारमध्ये होताना दिसत आहे. तासा दोन तासात चित्र स्पष्ट होईल. 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. प्रारंभी म्हणजेच बारा वाजेपर्यंत तरी भाजप-जेडीयूने 130 ठिकाणी आघाडी घेतली आहे तर राजद-कॉंग्रेस आघाडी 91 ठिकाणी आघाडीवर आहे. जर का हाच ट्रेंड राहिला तर बिहारमध्ये लहान भाऊ असलेला भाजप आता मोठा भाऊ झाल्याचे दिसून येईल. 

अर्थात मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष पिछाडीवर पडला असून बिहारी जनतेने भाजपला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू बिहारमध्ये पुन्हा चालली असल्याचे स्पष्ट होत आहे. 

बिहारमध्ये आमच्या कमी जागा आल्या तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील असा प्रचार भाजपचे नेते करीत होते. मात्र बिहारमध्ये नितीशकुमार कधी नव्हे इतक्‍या पिछाडीवर गेल्याचे दिसून येत आहे. 

2015 मध्ये नितीशकुमार यांनी राजद आणि कॉंग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक जिंकली होती. त्यापूर्वी म्हणजे दोन वर्षा अगोदर नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीयस्तरावरील नेतृत्वाला नितीशकुमार यांनी विरोध केला होता. एकीकडे बिहारमध्ये तिन्ही पक्षाला सत्ता मिळाली होती. मात्र नितीशकुमारांना राजद बरोबर संसार करू वाटला नाही. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा प्रभाव वाढू लागताच नितीशकुमारांनी ही आघाडी तोडून भाजपशी युती केली. 

त्यांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले.गेल्या तीन वर्षापासून त्यांनी भाजपबरोबर संसार केला खरा. जेडीयू-भाजपला राज्यात पुन्हा सत्ता मिळेल असे दिसते. पण, नितीशकुमारांचा पक्ष भाजपचा लहान भाऊ ठरेल असे चित्र आता तरी दिसून येत आहे. काही तासातच चित्र स्पष्ट होईल पण, जेडीयूला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. जर जेडीयूने चांगली कामगिरी केली असती तर एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असते. राजद आणि कॉंग्रेसच्या इतक्‍या जागा वाढल्याचे दिसून आले नसते. नितीशकुमारांना तेजस्वी यादव, चिराग पासवान या पोरांनी लक्ष्य के.ले. आपण थकला आहात. निवृत्त व्हा असा सल्ला ते देत होते. 

नितीशकुमारांनीही ही आपली शेवटची निवडणूक असल्याची साद मतदारांना घातली पण, त्याचा काही फायदा त्यांना झालेला दिसून येत नाही. आता तरी भाजप78 जागी आघाडीवर असून जेडीयू48 जागांवर पुढे आहे. म्हणजेच भाजप जेडीयूचे पुढे गेला असल्याचे दिसून येत आहे. अर्थात महाराष्ट्रात कधी काळी भाजप शिवसेनेचा लहान भाऊ होता. तो 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वामुळे मोठा भाऊ बनला. अर्थात महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आला. आता तसेच बिहारमध्ये होताना दिसत आहे. तासा दोन तासात चित्र स्पष्ट होईल.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख