आमचाच उमेदवार विजयी होणार..भाजप, राष्ट्रवादी आशावादी - BJP hopes for victory  NCP is also optimistic about the rural vote | Politics Marathi News - Sarkarnama

आमचाच उमेदवार विजयी होणार..भाजप, राष्ट्रवादी आशावादी

उत्तम कुटे
बुधवार, 2 डिसेंबर 2020

पुणे शहर आणि जिल्ह्यात मतदान गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांपैकी (३,२००) फक्त दहा टक्के जणांनी मतदान केले.  

पिंपरी : "पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाने नोंदणी केलेल्यापैकी पन्नास टक्के मतदान झाल्याने पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा भाजपचे शहर निरीक्षक आमदार निरंजन डावखरे यांनी आज ' सरकारनामा'शी बोलताना केला. तर, मतदारसंघाच्या ग्रामीण भागात शहरापेक्षा जास्त मतदान झाल्याने पदवीधरमध्ये आघाडीचा उमेदवार बाजी मारेल," असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस फजल शेख यांनी केला आहे.

दरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्यात मतदान गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांपैकी (३,२००)फक्त दहा टक्के जणांनी मतदान केले. तर शहरात मतदान असलेल्या पुण्यातील नऊ हजार मतदारांपैकी बहुतांश  न आल्याने अपेक्षित मतदानाचा टप्पा गाठता आला नाही. तरीही यावेळच्या उद्योगनगरीतील मतदानात वाढ झाली आहे. कारण, मतदानासाठी मतदारांची ने - आण करण्यासाठी रिक्षांसह मोटारींची व्यवस्था करण्यात आली होती.

दूर असलेल्या मतदानकेंद्रांचा फटका बसल्याची कबुली शहरात गेले ११ दिवस ठाण मांडून बसलेल्या डावखरे यांनी दिली. त्यामुळे शहरात तीस टक्केच मतदान झाले. मात्र, पक्षाने नोंदवलेल्या मतदारांपैकी पन्नास टक्के मतदान झाल्याने आमचा उमेदवार उजवा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही पदवीधरांची नावे पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्ही ठिकाणी असल्याने घोळ झाला. 

काही हजार मतदारांचे मतदान शहराबाहेर ,तर त्याच्या तिप्पट पुण्यातील मतदारांचे मतदान पिंपरी चिंचवडमध्ये असल्यानेही मतदानाची अपेक्षित टक्केवारी गाठत आली नसल्याचे त्यांनी सांगितले. पुणे पदवीधरमधील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात त्यातही सोलापूरसारख्या ठिकाणी अधिक मतदान झाल्यामुळे राष्ट्रवादी विजयी होणार असल्याचे शेख म्हणाले. 

विधानपरिषदेच्या कालच्या निवडणुकीत ६९ टक्के मतदान झाले. अपेक्षेपेक्षा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा ते जास्त आहे. मात्र, सर्वाधिक मतदार असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात ते सर्वात कमी झाले आहे. पदवीधरपेक्षा शिक्षक मतदासंघात मतदानाचा टक्का जास्त आहे.

तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी अशा सहा मतदारसंघांसाठी ही निवडणूक झाली. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जिल्ह्यात सर्वात कमी मतदान हे सर्वात जास्त मतदार आणि बुद्धिजीवींच्या शहराचा (पुणे)समावेश असलेल्या पुणे जिल्ह्यात झाले. तेथे पदवीधरला ४४ ८७, तर शिक्षकसाठी ५८.४३ मतदान झाले. सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले. तेथे पदवीधरसाठी ६८.०९ आणि शिक्षकमतदारसंघात ८६.७७ एवढे  मतदान झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख