अन्वय नाईकांची फाईल पुन्हा उघडली तर अडचणीत येण्याची भाजपला भीती  - BJP fears trouble if Anvay Naik's file is reopened : Bhaskar Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

अन्वय नाईकांची फाईल पुन्हा उघडली तर अडचणीत येण्याची भाजपला भीती 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

आपल्या केंद्रीय नेत्यांना खूश करण्यासाठी ते राज्यातील प्रत्येक मराठी माणसांचा द्वेष करत आहेत

पुणे : "राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. भाजपला भीती वाटते आहे की 2018 मध्ये अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची केस आपण उगाचच दडपून टाकली. ती केस बंद करून टाकली होती. ती फाईल पुन्हा उघडली, तर आपण अडचणीत येऊ, या भीतीपोटी भाजपच्या नेत्यांचा सध्या पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून कांगावा सुरू आहे,' अशा शब्दांत माजी मंत्री, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला. 

आमदार जाधव हे चिपळूणमध्ये माध्यमांशी बोलत होते, त्या वेळी त्यांना पत्रकार अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक आणि भाजप नेत्यांकडून त्यांच्या सुटकेसाठी करण्यात येणारी आंदोलने, सरकारला देण्यात इशारे याबाबत प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना जाधव यांनी भाजपवर वरील आरोप केला. 

ते म्हणाले की, राज्यातील भारतीय जनता पक्षाचा बुद्धिभ्रंश झाला आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसांबद्दल भाजपला भयंकर द्वेष निर्माण झाला आहे. आपल्या केंद्रीय नेत्यांना खूश करण्यासाठी ते राज्यातील प्रत्येक मराठी माणसांचा द्वेष करत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. 

आमदार जाधव म्हणाले की अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत या दोघांच्या माध्यमातून भाजपने त्या वेळी मराठी माणसांवर शरसंधान केले. आज अर्णब गोस्वामींवरून तेच सुरू आहे. 

"अन्वय नाईक आणि त्यांची आई ही अलिबागमधील मराठी माणसे आहेत. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्वतः पत्रकार अर्णब गोस्वामी आणि इतर दोन व्यक्तींची नावे लिहून ठेवली आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या स्टुडिओच्या आर्किटेक्‍चरचे इनटिरेअर डेकोरेशनचे काम अन्वय नाईक यांनी केले होते, त्याचा पुरावा आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे,' असे जाधव म्हणाले. 

या प्रकरणी भाजपच्या नेत्यांनी मराठी माणसांच्या पाठीमागे उभे राहण्याऐवजी आज त्या अर्णब गोस्वामींच्या पाठीशी उभे राहत आहेत. याचा अर्थ भाजपला भीती वाटते आहे की 2018 मध्ये अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची केस आपण उगाचच दडपून टाकली होती. ती केस बंद करून टाकली होती. ती फाईल पुन्हा उघडली तर आपण अडचणीत येऊ, या भीतीमुळेच भारतीय जनता पक्षाचा सध्या कांगावा सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख