बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपने सोपविली फडणविसांवर - BJP appoints devendra fadnavis as bihar election campaign chief | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपने सोपविली फडणविसांवर

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

महाराष्ट्र हा बिहारच्या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

पुणे : मूळ बिहारचा असलेला अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. बिहारामध्ये आगामी वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी दिल्याचे वृत्त काही इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. ते खरे असेल तर फडणवीस यांच्यावर पक्षाने मोठा विश्वास टाकल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे. या वृत्ताची `सरकारनामा`ने स्वतंत्ररित्या खात्री केलेली नाही. 

या निवडणुकीत भाजप आणि नितिशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाची युती होणार आहे. गेल्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यानंतर ते एकत्रित सत्तेवर आले. सुशांतसिंह याच्या आत्महत्येचा मुद्दा या निवडणुकीत मुख्य मुद्दा बनविण्याचा या दोन्ही पक्षांचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारमधील घटकपक्ष करत आहेत. या आरोपाचे निराकारण होण्या आधीच महाराष्ट्रातील नेत्याकडे भाजपने सूत्रे देऊन या बिहारमधील निवडणूक महाराष्ट्र केंद्रीत करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिहार सरकारसह भाजपने सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा आग्रह धरला होता. मुंबई पोलिसांवर बिहारी नेत्यांनी आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती. त्यावरून महाराष्ट्र विरुद्ध बिहार असेही चित्र उभे राहिले होते. आता महाराष्ट्रातील नेत्याकडे बिहारची जबाबदारी देऊन हे ध्रुवीकरण आणखी टोकदार होण्याची चिन्हे आहेत. या मागे हे सारे राजकारण असले तरी फडणवीस यांच्यासाठीही ही मोठी संधी असल्याचे मानले जात आहे.

या पदावर माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांच्या नावाची चर्चा होती.   मात्र त्यांची जम्मू-काश्मिरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या नावाची चर्चा साहजिकच थांबली. त्यात सुशांतसिंहच्या प्रकरणाने उचल खाल्ल्याने फडणवीस हेच योग्य असल्याचे समोर आल्याने त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख