दक्षिणेत भाजप आणखी एका राज्यात सत्ता काबीज करणार - Bjp Allaince leading in Puducherry in assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

दक्षिणेत भाजप आणखी एका राज्यात सत्ता काबीज करणार

वृत्तसंस्था
रविवार, 2 मे 2021

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये भाजप आघाडीने सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

पुदुच्चेरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये भाजप आघाडीने सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एकूण 30 विधानसभा मतदारसंघांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीने सध्या आघाडी मिळवली आहे. तर केवळ 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे या राज्यांत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश मिळणार आहे. तर कर्नाटकनंतर दक्षिणेतील आणखी एका राज्यात भाजप सत्ता काबीज करणार आहे. 

पुदुच्चेरीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक झाली आहे. राज्यात तीन नामनिर्देशित सदस्य असतात. 2016 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. तर एआयएडीएमके व एनआर काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. 

भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत. एक्झिट पोलनुसार, पुदुच्चेरीत एनआर काँग्रेस-भाजप आघाडीला विजय मिळेल. या आघाडीला 18 जागा मिळतील. काँग्रेस आघाडीला 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यानुसार सुरूवातीच्या मतमोजणीच्या कलांनुसार भाजप आघाडीला आतापर्यंत 16 जागांवर आघाडी मिळाली आहे. या राज्यात एनआर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असून याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल. 

भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले ई. श्रीधरन आघाडीवर; पण सत्तेपासून कोसो दूर

केरळमध्ये भाजपने सत्ता मिळवण्यासाठी मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना मैदानात उतरवले होते. पण त्याचा कोणताही परिणाम निवडणूक निकालांवर झालेला दिसत नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. सुरूवातीच्या मतमोजणीनुसार श्रीधरन हे पलक्कड मतदारसंघातून आघाडीवर आहेत. भाजपच्या हाती केवळ हीच जागा लागण्याची शक्यता सुरूवातीच्या कलांवरून दिसते.

एक्झिट पोलनुसार, केरळमध्ये डावेप्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांच्या आघाडीत जोरदार टक्कर होणार असे दिसत होते. एलडीएफला 87 तर यूडीएफला 51 जागा, तर भाजपला केवळ 2 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार केरळमध्ये मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफने बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेस आघाडीला एक्झिट पोलचा आकडाही गाठता येणार नाही, अशी शक्यता आहे. 

भाजपच्याबाबतीत एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपने सत्ता मिळवण्यासाठी 88 वर्षांच्या श्रीधरन यांना पक्षात आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय नेत्यांनी केरळमध्ये जोरदार प्रचार केला. पण त्याचे रुपांतर मतांमध्ये करण्यात अपयश आले आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप केवळ एका जागेवर आघाडीवर आहे. ही जागा श्रीधरन यांची आहे. 

केरळमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार एलडीएफला 91 तर यूडीएफला केवळ 47 जागांवर आघाडी आहे. भाजपसह इतर पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहेत. यूडीएफने बहुमताचा आकडा पार करत काँग्रेसचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवल्याचे दिसते. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केरळमध्ये जोरदार प्रचार केला होता. लोकसभा निवणूकीत त्यांनी केरळला पसंती देत निवडणूक लढवत जिंकली होती. पण विधानसभा निवडणूकीत त्यांना फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख