बिहारमध्ये लालू प्रसादांचे पुत्र मैदानात, तेजस्वी ट्रॅक्‍टरचे सारथी तर तेजप्रताप टपावर  - In Bihar, Lalu Prasad's son is on the field, Tejaswi is the driver of the tractor and Tejpratap is on the stage | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये लालू प्रसादांचे पुत्र मैदानात, तेजस्वी ट्रॅक्‍टरचे सारथी तर तेजप्रताप टपावर 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

आज पाटणात काढण्यात आलेल्या ट्रॅक्‍टर रॅलीचे सारथी होते खुद्द माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि ट्रॅक्‍टरच्या टपावर बसले होते तेजप्रसाप यादव.

पाटणा : कृषी विधेयकांवरून देशातील शेतकरी पुन्हा एकदा संघटित झाल्याचे दिसून येत असून आपल्या न्याय मागण्यासाठी तो आता रस्त्यावर उतरला आहे. बिहारमध्येही ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांचे दोन्ही पुत्रही रस्त्यावर उतरले असून या दोघा भावानी राज्यातील नितीशकुमार सरकारसह केंद्रातील मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. 

बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. लालूप्रसाद तुरुंगात असल्याने मुख्य प्रतिस्पर्धी मैदानात नसल्याने आपण निवडणूक सहज जिंकू असे सत्ताधाऱ्यांना वाटत असले तरी तशी परिस्थितीही राज्यात नाही. लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी लालूप्रसाद यांच्याप्रमाणे पक्षावर आपली पकड ठेवली आहे. 

गेल्या काही महिन्यापासून विजनवासात गेलेले त्यांचे बंधू प्रतापसिंह यादव यांनीही भावाच्या खांद्याला खांदा लावून आज मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. कृषी विधेयकाच्या विरोधात आज देशभर भारत बंदची हाक विरोधकांनी दिली आहे. या संधीचा फायदा उठवित राजदचे नेतेही बिहारमध्ये रस्त्यावर उतरले. 

आज पाटणात काढण्यात आलेल्या ट्रॅक्‍टर रॅलीचे सारथी होते खुद्द माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि ट्रॅक्‍टरच्या टपावर बसले होते तेजप्रसाप यादव. या ट्रॅक्‍टर रॅलीत महिलांसह शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून येत होते. 

तेजप्रसाद यादव हे प्रारंभी राजकारणात सक्रिय झाले होते, मात्र त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या वैयक्तिक जीवनात वादळ उठले. त्यांनी पत्नीला घटस्फोट देण्यासाठी न्यायालयात अर्जही केला होता. तसेच ते देवाधर्मालाही लागले होते. तेजप्रताप पुन्हा राजकारणात येतात की नाही असे वाटत असतानाच आज नेमके ते ट्रॅक्‍टर रॅलीत प्रकटले आहेत. 

लालूप्रसाद यादव यांच्या उपस्थित राजदने पाटणातील गांधी मैदानात एकदा मोठे शक्तीप्रदर्शन केले होते आणि यावेळी देशभरातील बड्या नेत्यांनाही बोलाविण्यात आले होते. त्यावेळीही तेजप्रताप यांनी जोरदार भाषण करून उपस्थितीतांची मने जिंकली होती. ते म्हणाले होते, की तेजस्वी भैय्या कृष्ण आहे तर मी अर्जुन आहे.

आम्ही वडलांचा वारसा यशस्वीपणे चालवू. तसेच तेजस्वींच्या मागे खंबीरपणे उभा राहणार असल्याचे म्हटले होते. आज देशव्यापी बंदमध्ये सहभागी होऊ दोन्ही भावानी आम्ही आजही एकत्र आहोत हे नितीशकुमारांना आणि भाजपला दाखवून दिल्याचीही सोशल मीडियावर चर्चा होती.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख