मुंबई : बिहार निवडणुकीच्या निकालावरून भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे बिहार विधानसभेत शिवसेनेला कोणत्या मतदारसंघात किती मते मिळाली, याची आकडेवारी निलेश राणे यांनी टि्वट केली आहे. "वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन..." अशी खोचक टीका राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही, कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करेल ही आम्हाला खात्री आहे, असे टि्वट राणे यांनी केलं आहे. "शिवसेनेनं स्वत:चा कचरा करुन घेतला आहे. बिहारमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची परिस्थिती जशी झालीय तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल," असंही निलेश राणे म्हणाले.
बिहार निवडणुकीत भाजप - जेडीयूच्या एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "एमआयएम- डेमाॅक्रेटिक फ्रंट ने मते खाल्ली असे काँग्रेसचे म्हणणे असेल तर मते खाण्याची ही बाब राष्ट्रीय जनता दलालाही लागू होते. त्यांना लागू होत नसेल तर मग इतरांबाबत काँग्रेसने बोलू नये. गेल्या सभागृहात काँग्रेसचे ३३ सदस्य होते. आता ही संख्या २० वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसने आपले चारित्र्य पहावे,"
बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी.
बेनीपूर: शिवसेना 469 मते, नोटाला 2145
राघोपुर: शिवसेना-30, नोटा-310
गया: शिवसेना-21 मते, नोटा-79.
मधुबनी: शिवसेना-63, नोटा-222
नरपतगंज: शिवसेना-२, नोटा-50
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2020
हेही वाचा : नितीशकुमार यांचे सात मंत्री पराभूत
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असले तरी नितीशकुमार यांच्या जेडीयू पक्षाला चिराग पासवान यांच्या लोजपने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. लोजपमुळे जेडीयूच्या पाच मंत्र्यांसह नितीशकुमार यांच्या कॅबिनेटमधील सात मंत्री पराभूत झाले आहेत. त्यात भाजप कोट्यातील दोन मंत्री सुरेश शर्मा आणि बृजकिशोर बिंद यांचा समावेश आहे.
जयकुमार सिंह: जेडीयूचे मातब्बर नेते आणि सहकार मंत्री जयकुमार सिंह पराभूत झाले. ते रोहतासच्या दिनारा मतदारसंघातून सतत जिंकत होते. राजदचे विजयकुमार मंडल यांनी त्यांना पराभूत केले.
सुरेशकुमार शर्मा: बिहारचे नगरविकास मंत्री सुरेश शर्मा मुझफ्फरपूर मतदारसंघातून पराभूत झाले. त्यांना कॉंग्रेसचे विजेंद्र चौधरी यांनी पराभूत केले.
संतोषकुमार निराला: राजपूर मतदारसंघातून मंत्री संतोष कुमार निराला पराजित झाले. ते कॉंग्रेसचे विश्वनाथ राम यांच्याकडून पराभूत झाले.
शैलेशकुमार: बिहारचे ग्रामीण विकास मंत्री शैलेशकुमार हे जमालपूर मतदारसंघातून पराभूत झाले. त्यांना कॉंग्रेसचे अजयकुमार सिंह यांनी पराभूत केले.
कृष्ण नंदन वर्मा: घोसी विधानसभेची जागा सोडून जहानाबाद येथे निवडणूक लढवणारे शिक्षणमंत्री कृष्णनंदन वर्मा पराभूत झाले आहेत. त्यांना राजदचे सुदय यादव यांनी पराभूत केले.
बृजकिशोर बिंद: बिहारचे उत्खन्न मंत्री बृजकिशोर बिंद हे चैनपूर मतदारसंघातून पराभूत झाले.
रामसेवक सिंह: हथुआ मतदारसंघाचे जेडीयूचे आमदार आणि समाजकल्याण मंत्री रामसेवक सिंह हे पराभूत झाले. या ठिकाणी राजदचे राजेश सिंह विजयी झाले.

