बिग बॉस फेम अभिजित बिचुकले पुणे पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात.. - Bigg Boss Fame Abhijit Bichukale in the arena of Pune Graduate Constituency | Politics Marathi News - Sarkarnama

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले पुणे पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पुणे : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपद, लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवून आपलं नशीब आजमावलं प्रयत्न केला आहे. आता ते पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरले आहेत. 

 "पैसा, सत्तेच्या ताकदीसमोर माझी चिकाटी कमी पडते. त्यामुळेच माझा पराभव होत आला आहे. परंतु पदवीधरच्या निवडणुकीत मतदारांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. मी शिक्षण आणि नोकऱ्यांना प्राधान्य देणार आहे. मला एकदा संधी देऊन पाहावी,” असं आवाहन बिचुकले यांनी मतदारानं केलं आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार म्हणून रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने अरूण लाड व उमेश पाटील यांचे नाव आघाडीवर असून भारतीय जनता पक्षाकडून संग्राम देशमुख, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, शेखर मुंदडा, रवींद्र भेगडे यांच्यासह राजेश पांडे, शेखर चरेगावकर यांचेही नाव चर्चेत आहेत. 

ठोंबरे पाटील या पुण्याच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांनी नगरसेविका म्हणून 2012 ते 2017 या दरम्यान काम केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या शैक्षणिक व सामाजिक कामे करत असतात. विधी क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. दरम्यान, सध्या त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा म्हणून जबाबदारी संभाळत आहेत. 

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सर्वपक्षीय चर्चेतील उमेदवारांची नावे बघता ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक एकत्रित लढण्यात येणार आहे. महाआघाडी तसेच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नसली तरी येत्या दोन-तीन दिवसांत दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. मनसेच्या वतीने वकील असलेल्या रूपाली पाटील-ठोंबरे यांची उमेदवारी निश्‍चित करण्यात आली आहे. 

पाटील म्हणाल्या, "गेल्या काही वर्षात पदवीधर आमदारांनी पदवीधरांसाठी काहीही केलेले नाही. पदवीधरांचे प्रश्‍नच सरकारी दरबारी प्राधान्याने मांडले जात नाहीत. पदवीधर मतदारसंघातून पक्षाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी तयारी करीत आहे. पक्षाचे अध्यक्ष, आमचे नेते राज ठाकरे यांच्याशी या संदरर्भात संपर्कात होते. त्यांच्याच आदेशाने पुणे पदवीधर मतदासंघातून अर्ज भरणार आहे. गेल्या काही दिवसांत मोबाईलच्या माध्यमातून 80 हजार पदवीधरांशी संपर्क साधण्यात यश मिळाले आहे. या पुढील काळात अधिक वेगाने पदवीधर मतदारांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'' 

राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ता. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख