शिवसेना नेत्याचे मोठे विधान : हे तर आदित्य यांचे करियर उध्वस्त करण्याचे कारस्थान - big statement by shivsena leader says This is a conspiracy to ruin career of aditya thackrey | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना नेत्याचे मोठे विधान : हे तर आदित्य यांचे करियर उध्वस्त करण्याचे कारस्थान

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

 युवा नेत्यांचे नाव खराब करण्याचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा खराब करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. एखाद्याचे राजकीय करियर उद्वस्त करण्याचा हा प्रकार आहे, अशीही टीका त्यांनी केली.

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेत्यांनी आपण मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी या आत्महत्येवरून सुरू असलेले राजकारण हे बिहारच्या निवडणुकीसाठी असल्याचा आरोप केला. तसेच या आत्महत्येशी आदित्य ठाकरे यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्र सरकार हे या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे का देत नाही, यावरून भाजप आणि बिहारमधील इतर राजकीय पक्ष हे टीका करत आहेत. तसेच या आत्महत्या प्रकरणाशी शिवसेना नेत्याचा संबंध असल्याची कुजबूज सुरू आहे. त्यावर परब यांनी ठामपण आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवा नेत्यांचे नाव खराब करण्याचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा खराब करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. एखाद्याचे राजकीय करियर उद्वस्त करण्याचा हा प्रकार आहे, अशीही टीका त्यांनी केली.

सुशांतसिंह याच्या आत्महत्येवरून बिहार सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे परब यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. आदित्य यांचे अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याशी नाव जोडले जात आहे. रियाच्या विरोधात सुशांतसिंह यांच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. तसेच बिहार पोलिसांनी गुन्हाही दाखल करून त्याच्या तपासासाठी पोलिस पथम मुंबईत पाठवले. त्या पथकातील अधिकाऱ्याला मुंबई पालिकेने क्वारंटाइन केले आहे. इतक्या साऱ्या घडामोडी सुरु असताना थेट आदित्य यांचे नाव कोणी घेतले नव्हते. मात्र परब यांनी सर्व टीकाकारांचा रोख कोणाकडे आहे, हे ओळखून हा सारा प्रकार आदित्य यांना अडचणीत आणण्याचा असल्याचे नमूद केले. 

राममंदिर भूमिपूजनाच्या मुद्यावर त्यांनी भाष्य केले. या कार्यक्रमासाठी शिवसेनेला निमंत्रण नसल्याच्या मुद्याबाबत परब म्हणाले की राम मंदिर उभारण्याचा पाया शिवसेनेने रचला आहे, कळसही आम्हीच चढवू. शिवसेनेला निमंत्रण मिळालेले नाही. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणींना निमंत्रण दिलंय का ते पाहावे लागेल. ज्या मंडळींनी या कार्य़क्रमाचे नियोजन केले आहे त्यांना ते कळायला हवे, असेही परब यांनी स्पष्ट केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख