मोठी बातमी... गृहमंत्र्यांवरील आरोपांची सरकार न्यायालयीन चाैकशी करणार - Big news! The government will take the allegations against the Home Minister to court | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी... गृहमंत्र्यांवरील आरोपांची सरकार न्यायालयीन चाैकशी करणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मार्च 2021

या आरोपासंदर्भात न्यायालयीन चाैकशी करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला असून, त्यासाठी चाैकशी आयोगही नियुक्त केला जाणार आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची न्यायालयीन चाैकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. 

ही चाैकशी निवृत्त न्यायामूर्तींमार्फत होणार असून, त्यासाठी लवकरच चाैकशी आयोग नियुक्त करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचा चेंडू आता कोर्टात जाणार आहे. 

मुंबई पोलिस आयुक्तपदावरून राज्य सरकारने केलेल्या बदलीला परमवीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच गृहमंत्री देशमुख यांनी महिन्याला शंभर कोटी रुपये हप्ता आपल्या पोलिस अधिकाऱ्यांना गोळा करण्यास सांगितला होता, त्याचीही सीबीआय मार्फत चाैकशी करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली होती. मात्र, ती फेटाळताना मुंबईतील घटना असल्याने प्रथम तेथील उच्च न्यायालयात जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यावर उद्या (ता. 25) सुनावणी होणार आहे. 

हा सर्व घटनाक्रम सुरू असतानाच आज या आरोपासंदर्भात न्यायालयीन चाैकशी करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला असून, त्यासाठी चाैकशी आयोगही नियुक्त केला जाणार आहे. त्यामुळे या चाैकशीतून काय बाहेर येईल, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.

दरम्यान, राज्यभर या प्रश्नी भाजपच्या वतीने आंदोलन केले जात आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवेदने दिली असून, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची न्यायालयीन चाैकशी सुरू होणार असल्याने भाजपच्या मागणीला यश आले, असा संदेश राजकीय वर्तुळातून जाईल, असे मानले जाते.

 

हेही वाचा..

नगर शहराची क्षयरोग मुक्‍तीकडे वाटचाल

नगर : नगर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोगदिनानिमित्त आज शहरामध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले. क्षय रुग्णांना महापालिकेतर्फे मोफत आरोग्यसेवा देण्यात येणार आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून काम सुरू असून, महापालिका क्षयरोग मुक्‍त शहर करणार आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिल बोरगे यांनी केले. 

जागतिक क्षयरोगदिनानिमित्त डॉ. अनिल बोरगे बोलत होते. सुरभि हॉस्पिटलचे डॉ. राकेश गांधी, न्यूरोसर्जन डॉ. प्रशांत जाधव, डॉ. अमित पवार, क्षयरोग अधिकारी जयश्री रौराळे, पर्यवेक्षक मंगल हजारे, योगेश औटी आदी उपस्थित होते. 

रौराळे म्हणाल्या, शहरामध्ये क्षयरोगा बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ठिकठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून, लक्षण आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. 

 

Edited By - Murlidhar karale

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख