'सध्याच्या सेक्युलर सरकारमधील मोठ्या व्यक्तीने डॉ. दाभोलकर प्रकरण दाबलं' - The big man in the current secular government, Dr. Dabholkar case suppressed : Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

'सध्याच्या सेक्युलर सरकारमधील मोठ्या व्यक्तीने डॉ. दाभोलकर प्रकरण दाबलं'

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभाग गेली सहा वर्षांपासून करत आहे. पण, या हत्या प्रकरणातील सूत्रधाराला पकडण्यात सीबीआयला अद्याप यश आलेले नाही. त्यावरून राज्यात आरोप -प्रत्यारोप रंगले आहेत.

मुंबई : ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी ७ वर्ष पूर्ण झाली. पण, या प्रकरणातील आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टर माईंडचा अजूनही शोध लागलेला नाही. तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय, असं म्हणतात. पण, आम्हाला तरी शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधील मोठी व्यक्ती आहे, ज्याने हे प्रकरण त्याचकाळी दाबले होते,’ असा खळबळजनक  गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभाग गेली सहा वर्षांपासून करत आहे. पण, या हत्या प्रकरणातील सूत्रधाराला पकडण्यात सीबीआयला अद्याप यश आलेले नाही. त्यावरून राज्यात आरोप -प्रत्यारोप रंगले आहेत. त्यातच अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपासही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. त्या वेळी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अद्याप लागले नसल्याचे सांगत सीबीआयला लक्ष्य करण्यात आले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दाभोलकर प्रकरणाचा उल्लेख करत सीबीआयच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही सीबीआयकडे सोपविण्यात आलेल्या सगळ्याच गुन्ह्यांची उकल होते असे नाही, असे म्हटले होते. डॉ. दाभोलकर यांचे चिरंजीव हमीद दाभोलकर यांनीही सीबीआयच्या तपासाबाबत खंत व्यक्त केली होती. सीबीआय गेली सहा वर्षे या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र, त्यांना अजूनही दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधाराला पकडता आलेले नाही, असे म्हटले होते. 

या सर्व घडामोडी घडत असताना प्रकाश आंबेडकर यांनीही ट्विट करत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाबाबत भाष्य केले आहे. त्यात त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ट्विटमध्ये आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ‘डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी ७ वर्ष पूर्ण झाली. पण, या प्रकरणातील आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टर माईंडचा अजूनही शोध लागलेला नाही. तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय, असं म्हणतात. पण, आम्हाला तरी शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधील मोठी व्यक्ती आहे, ज्याने हे प्रकरण त्याचकाळी दाबले होते.’

ते पुढे म्हणतात की ‘पुरोगामी हा व्यक्ती शोधतील का? समस्त पुरोगामी मंडळींना माझे सांगणे आहे की, ही लढाई न्यायालयीन नसून राजकीय आहे. तेव्हा त्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. इथल्या संत परंपरेविरुद्ध वैदिक परंपरेचे हे राजकीय युद्ध आहे. या युद्धातले खरे मित्र आणि खरे शत्रू ओळखून निराश न होता, न घाबरता हे आंदोलन चालू ठेवण्याची गरज आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना विनम्र आदरांजली’

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख