ट्रम्प समर्थकांना बायडेन म्हणाले, तुमची नाराजी समजू शकतो, कारण मी ही पराभव पाहिला आहे !  - Biden told Trump supporters, "I can understand your displeasure, because I've seen this defeat!" | Politics Marathi News - Sarkarnama

ट्रम्प समर्थकांना बायडेन म्हणाले, तुमची नाराजी समजू शकतो, कारण मी ही पराभव पाहिला आहे ! 

वृत्तसंस्था
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

देशात प्रचंड ध्रुवीकरण झाले असून हे ‘दडपशाहीचे युग’ तातडीने संपविण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. 

वॉशिंग्टन : ज्यांना फूट नको, एकता हवी आहे; पक्षाच्या दृष्टीकोनातून देशातील राज्यांची विभागणी न करता ‘युनायटेड स्टेट्‌स’ पहायचे आहे, त्या सर्व अमेरिकी नागरिकांचा मी अध्यक्ष होईन , असे आश्‍वासन अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज दिले. 

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अध्यक्षपदाच्या लढतीत रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह बायडेन यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. आपल्या मूळ गावी, डेलावर राज्यातील विलिंग्टन या गावी जनतेसमोर भाषण केले. 

अध्यक्षपदासाठी केलेल्या तिसऱ्या प्रयत्नात ते यशस्वी ठरले. त्यांनी १९८८ आणि २००८ मध्ये उमेदवारीसाठी पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. अमेरिकेतील जनतेने प्रचंड पाठबळ दिल्याबद्दल बायडेन यांनी जनतेचे आभार मानले. 

बायडेन म्हणाले की,‘‘मी भेदभाव न करता सर्वच अमेरिकी जनतेचा अध्यक्ष बनण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर विश्‍वास व्यक्त केल्याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे. मला मतदान केलेल्यांबरोबरच ज्यांनी मत दिले नाही, त्यांच्या विकासासाठीही मी काम करेन. सध्याचा राक्षसी काळ संपण्यास आता सुरुवात झाली आहे.’’ बायडेन हे विजयी झाले असले तरी ट्रम्प यांनी मात्र अद्याप आपला पराभव स्वीकारलेला नाही. 

अनेक राज्यांमध्ये निकालाविरोधात याचिका दाखल करण्याचा इरादा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या नाराज समर्थकांशीही बायडेन यांनी संवाद साधला. ‘तुमची नाराजी मी समजू शकतो. मी स्वत: पराभवाची चव चाखली आहे. पण आता, आपण एकमेकांना संधी देऊया. ही वेळ अमेरिकेला सशक्त करण्याची आहे,’ असे आवाहन बायडेन यांनी केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख