बायडेन यांच्यासाठी ओबामा मैदानात, ट्रम्प म्हणतात फरक पडणार नाही  - For Biden on the Obama field, Trump says it won't matter | Politics Marathi News - Sarkarnama

बायडेन यांच्यासाठी ओबामा मैदानात, ट्रम्प म्हणतात फरक पडणार नाही 

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

त्याचवेळी रिपब्लिकनचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ओबामा यांच्या प्रचाराने काही फरक पडणार नाही, असा दावा केला आहे

मॅकॉन : अध्यक्षपदाच्या निवडणुकीला जेमतेम दोन आठवडे राहिलेले असताना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आता डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यासाठी प्रचारात उतरणार आहेत. बायडेन यांच्या प्रचार मोहिमेने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

त्याचवेळी रिपब्लिकनचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ओबामा यांच्या प्रचाराने काही फरक पडणार नाही, असा दावा केला आहे. 

बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या दोन्ही कार्यकाळात ज्यो बायडेन (वय ७७) उपाध्यक्ष होते. ओबामा यांनी कमला हॅरिस आणि बायडेन यांच्यासाठी ऑनलाइन प्रचार केला आहे. परंतु ५९ वर्षाचे असणारे माजी अध्यक्ष प्रथमच प्रचारासाठी प्रत्यक्ष लोकांसमोर जात असल्याचे ही पहिलीच वेळ आहे. ओबामा यांचे वक्तृत्व प्रभावी असल्याने त्यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिक गर्दी करतील, असा अंदाज डेमोक्रॅटिकच्या समर्थकांना आहे. 

याबाबत काल बायडेन म्हणाले की, येत्या २१ ऑक्टोबरपासून माजी अध्यक्ष ओबामा हे डेमोक्रॅटिकच्या प्रचारासाठी फिलाडेल्फिया आणि पेन्सिलव्हेनियाचा दौरा करणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बायडेन यांना भारत-अमेरिकी समुदायाचा चांगला पाठिंबा मिळत आहे. त्याचवेळी भारतीय वंशांच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या उमेदवारीने भारतीय वंशांच्या नागरिकांत उत्साह असल्याचे म्हटले आहे. 

येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. काल प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात म्हटले की, नोंदणीकृत भारत-अमेरिकी मतदारांपैकी ७२ टक्के मतदारांनी बायडेन आणि हॅरिस यांना झुकते माप दिले आहे. त्याचवेळी ट्रम्प यांना केवळ २२ टक्के मते मिळत आहेत. 

बराक ओबामा प्रभावशाली प्रचारक नाहीत. एका अर्थाने ते प्रचारात उतरणार ही बातमी माझ्यासाठी चांगली आहे. कारण त्यांनी चांगले काम न केल्यानेच २०१६ मध्ये निवडून आलो. 
डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख