Being a Brahmin, I am being criticized | Sarkarnama

जात ब्राह्मण असल्यानं मी टिकेचा धनी...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काही जणांना वाटतं. काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

मुंबई : मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काही जणांना वाटतं. काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हणाले, "ज्यावेळी तुम्ही नागरिकांना समजावू शकत नाही, तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. त्यामुळे काहीही करून हे मागील सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सांगण मला शोभत नाही, पण दुदैवाने सांगतो की काही जणांना वाटतं की मी ब्राह्मण असल्याने मराठा आरक्षण माझ्या माथी मारलं तर चालतं, यासाठी काहीजण प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसविण्याचं काम करणारे यात यशस्वी होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्यदैवत आहे. त्यांच्या वंशजांबद्दल आपल्या सगळ्याच्या मनात अपार श्रद्धा आहे. यांच्यात कोणी फूट पाडू नये. मराठा आरक्षणाबाबत कोणी नेतृत्व करावं, यासाठी छत्रपतींच्या घरात दोन भाग पडतील, अशी परिस्थिती निर्माण करू नये, दोघांनीही त्याचं नेतृत्व करणं गरजेचं आहे. वाद होणार नाही, तसा प्रयत्न करू नये, दोन्हीही समजूतदार आहेत. दोघांनीही नेतृत्व करावं. 

पोलीस भरतीबाबत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “आजच करायची असेल तर चर्चा करा, मार्ग काढा. मराठा समाजाला आश्वस्त करा. अशी कोणतीही चर्चा न करता इतक्या गंभीर परिस्थितीत हा निर्णय घेतला जात आहे. राज्यकर्त्यांनी निर्णय घेताना परिणाम काय होणार आहेत याचा विचार केला पाहिजे. पोलिस भरती करावी लागणारच आहे, ती थांबवता येणार नाही. पण आता लगेच ती करण्याची घाई नाही. सुप्रीम कोर्टात सध्या मराठा आरक्षणावर काय होणार आहे, स्थगिती हटवू शकणार आहोत का? हे महत्त्वाचं आहे. याला एक महिनाच लागणार आहे. एक महिना उशिरा भरती झाली तर काही नुकसान होणार नाही. पण आधी झाली तर निश्चितच नुकसान होणार आहे. म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे.” 
 
...मराठा आरक्षणाशिवाय पोलिस भरती नको..

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खंडपीठासमोर आहे. यामुळे राज्य सरकारने पोलिस भरती करू नये, पोलिस भरती थांबविली नाही, तर मराठा समाजाचा आक्रोश रस्त्यावर दिसेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण सध्या न्यायप्रविष्ठ असताना, राज्य सरकार पोलिस भरती का करीत आहे, असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. ते म्हणतात की सरकारनं मराठा समाजाला चिथावणी दिली आहे. सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. मराठा आरक्षणाशिवाय ही पोलिस भरती करू नये. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असं टि्वट संभाजी राजेंनी केलं आहे. 
  
..तो पर्यंत नोकरभरती नको : संभाजी ब्रिगेड 

मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे या समाजातील मुलांसमोर मोठा प्रश्न उभारला आहे, त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणतीही नोकरभरती सरकारने करू नये, अशी मागणी  संभाजी ब्रिगेडने केली आहे. समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे, या बाबत सरकारला जाग यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांच्या नेतृत्त्वाखाली लाल महालसमोर नुकतेच मशाल आंदोलन करण्यात आले.  
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख