#lockdown : धसांची कायदेभंग तर धोंडेंची ‘जान है तो जहान है’ची भूमिका - Beed lockdown Different roles BJP leader Suresh Dhas, Bhimsen Dhonde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

#lockdown : धसांची कायदेभंग तर धोंडेंची ‘जान है तो जहान है’ची भूमिका

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मार्च 2021

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची लाट झपाट्याने पसरत आहे.

आष्टी (जि. बीड) : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि प्रसाराचा वेग खंडीत करण्यासाठी शुक्रवारपासून दहा दिवसांचे लॉकडाऊन सुरु झाले आहे. या निर्णयावर भाजपच्याच दोन नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. आमदार सुरेश धस म्हणतात सविनय कादेभंग करु तर माजी आमदार भीमसेन धोंडे म्हणतात लॉकडाऊनला विरोध चुकीचा असून ‘जान है तो जहान है’. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची लाट झपाट्याने पसरत आहे. रुग्णसंख्या तर अलिकडे रोज साडेतीनशे ते पावणेचारशे पर्यंत आहेच. आता तपासण्यांच्या तुलनेत आढळणारे रुग्णांचे प्रमाणही दहा टक्क्यांवरुन थेट पंधरा टक्क्यांच्या पुढे गेले आहे. 

कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी २६ मार्च ते चार एप्रिल असा दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला. या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि भूमिका उमटू लागल्या आहेत. सुरुवातीलाच भाजप आमदार सुरेश धस यांनी लॉकडाउनला विरोध करत निर्णयाच्या अंमलबजावणीच्या आदल्या दिवशी व्यापार्‍यांसमवेत तहसीलदारांना निवेदन दिले आणि सविनय कायदेभंगाचा इशारा दिला. शुक्रवारी लॉकडाउन सुरु होताच आमदार धस स्वतः बाजारपेठेत फिरून दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहन करत होते. 

प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीतही त्यांनी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजाभाऊ कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, नायब तहसीलदार नीलिमा थेऊरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे, मुख्याधिकारी नीता अंधारे, पोलिस निरीक्षक सलीम चाऊस आदींना लॉकडाउन अनावश्यक असल्याची भूमिका मांडली. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडची रुग्णसंख्या कमी आहे. इतर जिल्ह्यांत लॉकडाउन नसल्याने लॉकडाउनचा फारसा परिणाम होणार नाही, गोरगरीबांना त्रास होणार असल्याचे मुद्दे मांडत गुन्हे दाखल झाले तरी चालेल षंढासारखे गप्प बसणार नाही, असा इशाराही दिला. त्यानंतर ता. ३० नंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्याचे लेखी पत्रच आमदार धस यांना देण्यात आले. त्यानंतर आष्टीतील व्यापारपेठ बंद करत सोमवारपर्यंत कडक लॉकडाउन पाळून प्रशासनास सहकार्य करण्याचे ठरले.

धस यांच्या या भूमिकेनंतर भाजपचे माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी लागलीच सायंकाळी आष्टीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन धसांच्या भूमिकेला छेद दिला. ‘जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाउनचा निर्णय वेळेवर घेतला असून, मी त्यांचे अभिनंदन करतो. परंतु काही व्यक्ती लॉकडाउनला विरोध करून राजकारण करीत आहेत. माणसे जगणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. ‘जान है तो जहान है’ हे लक्षात घेऊन लॉकडाउनला समर्थन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख