पीपीटी किट घालून जिल्हाधिकाऱ्यांचा रुग्णांशी संवाद.. - Beed Collector Ravindra Jagtap interacts with patients by wearing PPT kit  | Politics Marathi News - Sarkarnama

पीपीटी किट घालून जिल्हाधिकाऱ्यांचा रुग्णांशी संवाद..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

रुग्णांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सुविधांचा आढावा घेतला.

बीड : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेले रुग्ण व संसर्गाचे प्रमाण रोखण्यासाठी लॉकडाउन सुरुच आहे. मात्र, रुग्णांना उपचाराची सुविधा आणि रुग्णांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सुविधांचा आढावा घेतला. पीपीई किट घालून कोव्हिड वार्डात जाऊन रुग्णांशीही संवाद साधला. तत्पुर्वी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लँटचे उद्घाटनही केले. 

कोविड वार्डांना भेटीसह जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग व परिसराचीही त्यांनी पाहणी केली. त्यांच्या समवेत बीडचे तहसिलदार शिरिष वमने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. ढाकणे, समन्वयक डॉ. सचिन आंधळकर, भांडारपाल मुंडे होते. सुविधा व उपचारांबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केल्याचे रविंद्र जगताप म्हणाले.

सध्या उपलब्ध असलेल्या पीपीई किटमुळे लवकरच अंगाला घाम येत असल्याच्या अधिकारी व परिचारिकांच्या तक्रारी योग्य आहेत. आपल्यालाही तसा अनुभव आला असून याबाबत शासनाला कळवून लवकरच नवीन किट मागविण्यात येणार असल्याचेही रविंद्र जगताप म्हणाले.

दरम्यान, मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूची पहिली लाट आली. जिल्ह्यात मे महिन्यात कोरोना विषाणूने प्रवेश केला. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी सर्वाधिक २०४ रुग्ण उपचाराखाली होते. पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्णांचा उच्चांक व्हायला जिल्ह्यात सहा महिने लागले होते. आता मात्र, या मार्च मध्ये दुसरी लाट आली आणि पाहता पाहता आजघडीला अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २६०० च्या घरात गेली आहे.

दरम्यान, आतापर्यंत साडेसहाशेवर कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे अलिकडे रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या तीनशे ते चारशेंच्या घरात आहे. सोमवारीही पावणेचारशेंवर रुग्ण जिल्ह्यात आढळले. पुर्वी शेकडा दहा टक्के असलेले रुग्णांचे प्रमाण सोमवारी १८ टक्क्यांवर पोचले आहे. अलिकडे प्रसाराचा वेग वाढल्याचे चित्र आहे. यावर उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यात दहा दिवसांचे लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

आता आज (ता. ३०) पासून काही शिथिलता देण्यात आल्या आहेत. दरम्यान, रुग्णांना उपचारात कुठलीही कसर राहू नये यासाठी प्रशासन तयारी करत आहे. सध्या पावणेतीन हजारांवर खाटा तयार आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या चारशे खाटांची क्षमता असून ३०८ रुग्ण उपचार घेत आहेत. आणखी दोनशे खाटा वाढविण्यात येणार असल्याचेही रविंद्र जगताप म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख