बारामती प्रशासनाचे धाबे दणाणले..कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी 119 रुग्ण  - Baramati Corona outbreak 119 patients in a single day | Politics Marathi News - Sarkarnama

बारामती प्रशासनाचे धाबे दणाणले..कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी 119 रुग्ण 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

बारामती शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे आता सर्वांना चिंता वाटू लागली आहे.

बारामती : शहरात आज कोरोना रुग्णांचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. काल तपासणी केलेल्या 551 रुग्णांपैकी तब्बल 119 रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने आता प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. आजपासून बारामती शहरात संध्याकाळी सात ते सकाळी नऊ या काळामध्ये जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे.  असे असले तरी रुग्णांचा वाढता आकडा कमी होताना दिसत नाही. 

दर दिवसागणिक बारामती शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे आता सर्वांना चिंता वाटू लागली आहे. बारामतीत गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी काल घेतलेल्या बैठकांच्या सत्रांमध्ये सविस्तर उपाययोजना केली आहे. 

बारामतीत संध्याकाळी सात नंतर  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.  शहरातील गर्दीची ठिकाणे शोधून तेथील गर्दी कमी करण्याचे निर्देशही कांबळे यांनी पोलिसांना दिले आहेत. आज सकाळपासूनच पोलिस ऍक्शन मोडमध्ये असून मॉर्निंग वॉक व  सायकलिंग करणाऱ्या अनेकांना  पोलिसांनी घरी पाठवले. शहरांमध्ये गर्दी होणारी अनेक ठिकाणे आहेत,  अशा ठिकाणांवर नगरपालिकेसह आता पोलिसांचेही लक्ष असेल, अशी माहिती पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली. 

मास्कचा वापर न करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई सुरू झाली असून सोशल डिस्टंसिंग चे उल्लंघन तसेच विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर ही पोलिस आता थेट कारवाई करणार आहेत. दरम्यान आजपासून बारामती शहरातील तिसरे कोविड केअर सेंटर नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने सुरू करण्यात येत असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली. रुग्णसंख्या याच वेगाने वाढत राहिली तर माळेगाव येथील वसतिगृहात देखील रुग्णांना दाखल केले जाणार आहे. दरम्यान बारामती नगरपालिकेने विविध प्रभागातील जवळपास 70 हजार नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी केली आहे. यामध्ये संशयित आढळणारे रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांची तपासणी केली जात आहे.  
 

पुणे शहरात सोमवारी (ता. २२) दिवसभरात २ हजार ३४२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एका दिवसातील एकूण नवीन कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३२१ वर गेली आहे. जिल्ह्यात आज ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये शहरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. काल शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार १८७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५६७, नगरपालिका क्षेत्र १७१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ५४ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, दिवसात ३ हजार ३०८ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांत शहरातील १ हजार ७८९, पिंपरी चिंचवडमधील ८४६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६०४, नगरपालिका हद्दीतील ५५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १४ जण आहेत.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४० हजार ९२ सक्रिय (ॲक्टिव्ह) रुग्ण आहेत. यापैकी
८ हजार ४११ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. उर्वरित ३१ हजार ६८१ जणांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २ हजार ९४२, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ८८३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ६४२, नगरपालिका हद्दीतील ६८२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील२६२ रुग्ण आहेत.

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख