काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजप नेते प्रवेश करणार...   - Balasaheb Thorat more bjp leader to join congress soon Politics Politics | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजप नेते प्रवेश करणार...  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 डिसेंबर 2020

भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई : काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा विचार हा शास्वत विचार असून तोच देश हिताचा आहे. सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे कार्य करावे लागणार आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.  

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य रमेश जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मदन पथवे, सावरगावपाठचे सरपंच रमेश पवार, समशेरफट गावचे सरपंच भास्करराव दराडे, देवगण गावचे एकनाथ सहाणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, काँग्रेस  सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी, पक्ष प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सचिव रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, राजाराम देशमुख, महिला काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, केंद्रातील सरकारने गरीब माणसाला ताकद देणारे कामगार हिताचे कायदे बदलण्याचे काम केले आहे. काही मूठभर लोकांसाठी, साठेबाज लोकांसाठी कृषी कायदे केले आहेत. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत एक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे, हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घातला आहे पण केंद्र सरकारकडे सहानुभूती नाही, त्यांची भूमिका क्रूर व अडेलतट्टूपणाची आहे. 

शेतकरी मूलभूत प्रश्न विचारत आहेत, परंतु केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही. भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार असून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाला लागलेली गळती पाहून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, भाजपातून कोणीही जाणार नाही, असा खोटा दावा देवेंद्र फडणवीस यांना करावा लागत आहे, असेही थोरात म्हणाले..

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख