तेव्हा बाळासाहेब ठाकरे त्या मुंडेंना म्हणाले होते, `` प्यार किया तो डरना क्या!` - balasaheb thackray had supported gopinath munde now who will help Dhananajy | Politics Marathi News - Sarkarnama

तेव्हा बाळासाहेब ठाकरे त्या मुंडेंना म्हणाले होते, `` प्यार किया तो डरना क्या!`

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

ठाकरेंनी धनंजय मुंडे यांच्यावरील ताण हलका केला होता... 

पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संबंधावरून सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुंडे यांनी हे संबंध मान्य करत या प्रकरणाची घरच्यांना कल्पना असल्याचे जाहीर केले. तसेच मुलांनाही आपले नाव दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावरून त्यांच्यावर टिकेची झोड उठत असली तरी यानिमित्ताने त्यांचे काका आणि भाजपचे नेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्याही आयुष्यात अशाच संबंधावरून वादळ उठल्याचे अनेकांना स्मरण झाले. 

गोपीनाथ मुंडे हे तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या संबंधांचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ते व्यतिथ झाले होते. त्या मुलाचे नाव आणि संबंधित महिलेचे घरही शोधून त्याच्या बातम्या झाल्या होत्या. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या रोखठोक शैलीत मुंडेंना पाठिंबा दिला होता. प्यार किया तो डरना क्या, असे म्हणत अशा प्रकरणात दम नसल्याचे त्यांनी जाहीररीत्या सांगितले.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण या निमित्ताने झाली आणि त्यांनीही प्यार किया तो डरना क्या, असे वाक्य सांगत धनंजय मुंडे यांचा हा खासगी विषय असल्याचे स्पष्ट केले.  भाजप नेत्यांची अशी बरीचे प्रकरणे आपल्याला माहिती असल्याचे सांगत कोणी या विषयावरून राजकारण करू नये, असाही इशारा सत्तार यांनी दिला.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले....

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात दुस-या पत्नीच्या बहिणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलिसांनीच या प्रकरणातील सत्य बाहेर आणावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

श्री. फडणवीस यांच्या हस्ते कुर्तकोटी शंकराचार्य न्यास संकुलातील सभागृहात नाना नवल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमप्रसंगी ते म्हणाले, सध्या राज्यातील सत्ताधारी मंडळींना आरोप करण्याची सवय झाली आहे. केंद्र सरकारकडून अन्याय होत असल्याची तक्रार ते सतत करीत असतात. त्यामुळेच कोरोना लसीकरणासाठी कमी लस मिळाली असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अपुरी लस मिळाली हा आरोप खोटा आहे. राज्य सरकार आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी हे कीरत आहेत. नाकर्तेपणा लपविण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख