“तुमचा भाऊ आणि बाप विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,”.. मोईत्रांचे रामदेव बाबांना प्रत्युत्तर - baba ramdev statement about allopathy mahua moitra slam baba ramdev | Politics Marathi News - Sarkarnama

“तुमचा भाऊ आणि बाप विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,”.. मोईत्रांचे रामदेव बाबांना प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 मे 2021

तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिलं.

नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा यांनी अॅलोपथी बाबत केलेल्या विधानाबाबत तृणमूल कॅाग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या रामदेव बाबांवर भडकल्या आहेत. मोदी आणि शहा यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी बाबा रामदेव यांना सुनावलं. खासदार महुआ मोईत्रा यांनी टि्वट करुन रामदेव बाबांवर निशाणा साधला आहे. baba ramdev statement about allopathy mahua moitra slam baba ramdev

आयएमएने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर रामदेव बाबा यांना अटक करा, असा हॅशटॅश सुरु आहे. त्यावर रामदेव बाबा यांनी काल म्हटले, "मला त्यांचा बापही अटक करु शकत नाही. " यावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे.

आपल्या टि्वटमध्ये खासदार महुआ मोईत्रा म्हणतात की, “स्वामी रामदेव यांना कुणाचा बापही अटक करू शकत नाही.” रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिलं.

अॅलोपथी औषध, आणि डॉक्टरांवर टीका करून डॉक्टरांना २५ प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान करणाऱ्या योगगुरु रामदेव बाबा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तराखंडच्या इंडिअन मेडिकल असोसिएशन शाखेकडून (IMA) रामदेव बाबांवर १ हजार कोटींचा मानहानी दावा करण्यात आला आहे. आयएमएने रामदेव बाबांना याबाबतची नोटीस काल पाठविली आहे.  
असोसिएशनचे सचिव डॉ. अजय खन्ना म्हणाले की, रामदेव बाबांना अॅलोपथी मधले अ सुद्धा माहिती नाही. आम्ही त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ पण त्यापूर्वी त्यांनी आपली योग्यता सिध्द करावी. आम्ही रामदेवबाबांना १५ दिवसाची मुदत दिली आहे. या वेळात त्यांनी केलेल्या विधानांबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहोत.

रामदेवबाबांना अॅलोपथीचे ज्ञान नाही तरीही ते डॉक्टर विरुध्द वादग्रस्त विधाने करीत आहेत. करोना काळात रात्रदिवस रुग्णसेवेत असलेल्या डॉक्टर्सचे मनोबल त्यामुळे कमी होत आहे. आजार आणि उपचार या बाबत बाबा नेहमीच अवैद्यानिक दावे करतात. कॅन्सरवर उपचाराचा दावा सुद्धा ते करतात. असे असेल तर त्यांना नोबेल मिळायला हवे, असे डॅा. अजय खन्ना यांनी म्हटलं आहे. 
कोरोना काळात असली विधाने करणाऱ्या बाबांवर सरकारने महामारी कायद्यानुसार कारवाई करायला हवी, अन्यथा आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत, असे खन्ना म्हणाले
 Edited by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख