अशोक पवारांची प्रशासनाला नुकसानीचे पंचनामा करण्याची सूचना; कोल्हे उद्या पूर्व हवेलीत  - Ashok Pawar's instruction to the administration to conduct a panchnama of damages; MP Kolhe in East Haveli tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक पवारांची प्रशासनाला नुकसानीचे पंचनामा करण्याची सूचना; कोल्हे उद्या पूर्व हवेलीत 

जनार्दन दांडगे 
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे.

उरुळी कांचन (जि. पुणे) : हवेलीसह शिरूर तालुक्‍यात मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही तालुक्‍यांतील शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे. 

या बाबत आमदार अशोक पवार म्हणाले की, हवेली, शिरूर या दोन तालुक्‍यासह संपूर्ण जिल्ह्यातच मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यातच बुधवारी (ता. 14 ऑक्‍टोबर) दुपारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. शिरूर व हवेली तालुक्‍यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. 

पूर्व हवेलीत उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह अनेक गावांतील नागरिकांच्या घरांचे, मालमत्ता व शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्‍यांतील ओढे, नाले अद्यापही तुडुंब भरून वाहत आहेत. पुढील 48 तास अतिवृष्टीची होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविल्याने, नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावे, असे आवाहन आमदार पवार यांनी केले. 

पूर्व हवेलीत कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, कोलवडी, वाडेबोल्हाईसह अनेक गावांत बुधवारी झालेल्या अतिवृष्ठीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याच्या सूचना हवेलीचे विभागीय अधिकारी सचिन बारवकर व तहसीलदार सुनील कोळी यांना दिल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले. 

मागील वर्षभरात दोन वेळा पूर्व हवेलीमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. या नुकसीनाचे पंचनामे झाले तरी, अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. यामुळे मागील वर्षभरात झालेल्या शेतपिकाच्या नुकसानाची भरपाईही तत्काळ देण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

शिरूर तालुक्‍यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना शिरूरचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांना देण्यात आल्याचेही पवार यांनी नमूद केले. 

डॉ. अमोल कोल्हेही करणार पाहणी 

दरम्यान, पूर्व हवेलीत बुधवारी दिवसभरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे शुक्रवारी (ता. 16 ऑक्‍टोबर) पूर्व हवेलीत येणार आहेत, अशी माहिती आमदार पवार यांनी या वेळी दिली. खासदार कोल्हे यांच्या समवेत महसूल व कृषी खात्याचे तालुक्‍यातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख