#मराठा आरक्षण ; घटनापीठ स्थापन करण्यासाठी सरकारचा तिसरा अर्ज.. - Ashok Chavan, Chairman, Maratha Reservation Sub-Committee, informed about the third application of the government for setting up a Maratha Reservation Bench | Politics Marathi News - Sarkarnama

#मराठा आरक्षण ; घटनापीठ स्थापन करण्यासाठी सरकारचा तिसरा अर्ज..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधिशांनी हे सूतोवाच केल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी आज सरन्यायाधिशांना केली. राज्य सरकारने यापूर्वी दोन वेळा म्हणजे ७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर रोजी लेखी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचेही रोहतगी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधिशांनी सांगितले. 

घटनापीठाची तातडीने स्थापन करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज (२ नोव्हेंबर) याच मागणीचा लेखी अर्ज तिसऱ्यांदा सादर करण्यात आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

साताऱ्यात मराठा आरक्षण गोलमेज परिषदेला सुरवात झाली आहे. पाच जिल्ह्यातून समन्वयक गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले आहेत.  सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथून मराठा समन्वयक या परिषदेला उपस्थित आहेत. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले परिषदेला उपस्थित आहेत. त्यांनी परिषदेच्या हॉलमध्ये प्रवेश करताच जोरदार घोषणाबाजी झाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्यांचे परिषदेच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.
  
या परिषदेमधून आजपर्यंत खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या प्रश्नांच्या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली नसून त्यांनी आपली भूमिका पहिल्यांदा जाहीर करावी, ही एक महत्वाची मागणी असल्याची माहिती सुरेश दादा पाटील यांनी दिली आहे. या परिषदेला मराठा आरक्षण संघर्ष समिती, मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा या समित्यांचे पाच जिल्ह्यांमधील पदाधिकारी उपस्थित आहेत. साताऱ्यातील साई सम्राट कार्यालयात या परिषदिला सुरवात होत आहे. या परिषदेकडे सर्व मराठा बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख