महाराष्ट्राचे कारभारी, लयभारी..भारतरत्नांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? - Ashish Shelar criticizes minister anil deshmukh issued order enquiry celibrity | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्राचे कारभारी, लयभारी..भारतरत्नांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : "महाराष्ट्राचे कारभारी शर्जिल उस्मानीला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार," अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर व किक्रेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या टि्वटची चौकशी करणार असल्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 

देशमुखांच्या विधानांचा समाचार शेलार यांनी घेतला. आपल्या देशांतर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पॉप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता राज्याचे गृहमंत्री हे तेंडुलकर आणि लतादीदी यांच्या टि्वटची चौकशी करणार असल्याचे भयंकर वृत्त समजले, असे टि्वट करून शेलार यांनी सरकारवर कोरडे ओढले आहेत. 

कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर सत्तेत बसल्यावर महाराष्ट्राच्या कारभारी असलेल्या शिवसेनेने, आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक हिला सोडून दिले, शर्जिल उस्मानी याला पळून जाण्यास मदत केली आणि या भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. वा रे वा, महाराष्ट्राचे कारभारी, लयभारी, असा टोलाही शेलार यांनी या ट्विट मध्ये लगावला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले होते. या ट्विटनंतर लता मंगेशकर यांच्यासह सचिन तेंडुलकर, कंगना राणावत, रोहित शर्मा, विराट कोहली अशा अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक ट्विट करून त्यांना विरोध केला. आता या ट्विटची राज्याचा गुप्तहेर विभाग चौकशी करणार आहे. केंद्र सरकारच्या दबावामुळे हे ही ट्विट करण्यात आला का? हे गुप्तहेर विभाग तपासणार आहे.

कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने राजधानी दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. आता हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं आहे.  याला उत्तर म्हणून सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेकांनी ट्विट केले. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत विरोधी प्रपोगंडा राबविली जात असल्याचा दावा केला होता. त्यावेळी '#IndiaTogether' '#IndiaAgainstPropoganda' असे हॅशटॅग वापरण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच देशातील सेलिब्रिटींनी हे हॅशटॅक वापरून रिहाना व ग्रेटला विरोध करणारे ट्विट केले.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख