शेलारांची सारवासारव : भाजपची सत्ता आल्यास फडणवीस हेच मुख्यमंत्री - ashish shelar clears his stand about CM post | Politics Marathi News - Sarkarnama

शेलारांची सारवासारव : भाजपची सत्ता आल्यास फडणवीस हेच मुख्यमंत्री

अमोल कविटकर
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

मराठा महिला मुख्यमंत्री झाल्यास माझा पाठिंबा, हे वक्तव्य चर्चेत राहिले.

पुणे : कर्तृत्ववान मराठा महिला मुख्यमंत्रीपदी आल्यास माझा पाठिंबा असेल, या वक्तव्यावरून राजकीय धुरळा उडवून देणारे भाजप नेते आशिष शेलार यांनी यावरून आता सारवासारव केली आहे.

पुण्यात पत्रकारांशी आज बोलताना ते म्हणाले की कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवरील  पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात मी त्यावर बोललो. सर्व समाजातील स्त्रियांना उचित आणि सर्वोच्च स्थान मिळायला हवे, याच मताचा मी आहे. पुस्तकापुरताच हा विषय होता. भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी  देवेंद्र फडणवीसच असतील. मी अजूनही क्षमतावान नाही, छोटा कार्यकर्ता आहे. सत्ता आली तर देवेंद्रच मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शेलार यांच्या कालच्या वक्तव्यावरून वेगळीच चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले गेेले. त्यात शेलार यांचा देवेंद्र फडणवीस यांना विरोध आहे की काय, अशीही कुजबूज सुरू झाली. त्यावर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मुंबई महापालिकेत भाजपने निवडणूक प्रभारी म्हणून अतुल भातखळकर यांची नियुक्ती केली. त्यावर विचारले असता शेलार म्हणाले की आम्ही एकत्रित काम करु. भाजपात निर्णय सामूहिक होत असतात. मीही चर्चेत असतो.

थकीत वीजबिलांविषयीच्या मुद्यांवरून शेलारांनी सरकारवर टीका केली. ४५ लाख शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची थकबाकीची चौकशीचा आदेश सरकारने दिली आहे.  चौकशी म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं पाप ठाकरे सरकार करत आहे. २२ टक्के आम्ही नव्या जोडण्या दिल्या, २० टक्के वीज पुरवठा वाढवला. चौकशी करा, पण मोफत वीज देण्याकडे पाठ दाखवू नका. सरकारच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांना मनस्ताप होत आहे. वसुली अधिकाऱ्यासारखे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत करत आहेत. तिघाडी-बिघाडी सरकारने पहावी, लोकांना मनस्तप नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 शाळा सुरू करण्याच्या निर्णयात सरकारने संभ्रमाचे वातावरण तयार केले आहे. सर्व घटकांशी चर्चा करणे अपेक्षित होते.
शाळा सुरु करण्याच्या निर्णयात सरकारने केवळ पळकुटेपणा केला आहे. सरकार आहे की छळवणूक केंद्र, असा आरोप त्यांनी केला.

राज्यपाल कोट्यातून नेमावयाच्या विधान परिषदेच्या नावांसाठी आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना 15 दिवसांची मुदत दिली. ती मुदत आज संपत आहे. सरकारच्या या मुदतीलाही शेलार यांनी आक्षेप घेतला. राज्यपालांना अलिटमेटम देण्याची ही मनोवृत्ती कोणती? कायद्यात वेळेबाबत मर्यादा नाही. राज्यपालांना सन्मान देणार आहात की नाही? अशा अल्टमेटमला कोणी जुमानणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख