आसगावकरांचे समर्थक विजयाच्या जयघोषात मतदान केंद्रावर दाखल - Asgaonkar supporters entered the counting center after celebrating the victory by wearing gulal | Politics Marathi News - Sarkarnama

आसगावकरांचे समर्थक विजयाच्या जयघोषात मतदान केंद्रावर दाखल

सुनील पाटील
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांच्यासोबत समर्थकांनी गुलाल लावून विजय उत्सव साजरा करूनच मतमोजणी केंद्रावर  दाखल झाले. 

कोल्हापूर, ता. 3 : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झाले. दरम्यान आज मतमोजणीसाठी जाण्याआधी म्हणजे सकाळी तांबडं फुटायलाच (सूर्योदयलाच) शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांच्यासोबत समर्थकांनी गुलाल लावून विजय उत्सव साजरा करूनच मतमोजणी केंद्रावर  दाखल झाले. 

पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मतमोजणी होत आहे. शिक्षक मतदार संघासाठी 42 टेबलावर मतमोजणी होईल. प्रत्येक फेरीत तेराशे मते मोजले जातील. मतमोजणीचा अधिकृत निकाल ४ डिसेंबरला पहाटे जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शिक्षक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांनी आज सकाळी मतमोजणी केंद्रात जाण्याआधीच त्यांच्या समर्थकांनी एकमेकांना गुलाल लावत तासगावकर यांचा जयघोष केला. 

रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती आणि कसे मतदान झाले, याची गोळाबेरीज करणारे समर्थक आज पहाटे ही लवकर उठले. दरम्यान गेल्या महिनाभर सुरू असलेला प्रचाराचा धडाका. त्याला मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळे आसगावकऱ्यांच्या समर्थकांना विजयाची खात्री वाटू लागली आहे. त्यामुळेच त्यांनी आज सुर्योदयालाच जयंत आसगावकर यांच्या जयघोष करत विजय उत्सव साजरा केला.

मतदानाची वाढलेली टक्केवारी माझ्या विजयासाठीच : अरूण लाड
  
पुणे :  "पुण्यासह पाचही जिल्ह्यात झालेले विक्रमी मतदान माझ्या विजयाची नांदी आहे. या वाढलेल्या मतदानामुळेच मी मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होईन," असा विश्‍वास महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांनी आज ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केला.

आजपर्यंतच्या पदवीधरच्या निवडणुकीतील सर्व निवडणुकांचे विक्रम मोडीत काढत यावेळी पुणे मतदारसंघात तब्बल ५८ टक्के मतदान झाले. मतदारसंघात सर्वाधिक मतदान कोल्हापूरला ६८ टक्के तर सांगलीत ६५ टक्के मतदान झाले. सोलापूर जिल्ह्यात ६२ तर साताऱ्यात ५८ व पुण्यात ४५ टक्के मतदान झाले. गेल्यावेळच्या तुलनेत सरासरीच्या तिप्पट मतदान झाल्याने अमूक उमेदवार निवडून येईल, असे कोडीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.मात्र, लाड यांनी विजयाचा दावा केला असून झालेले मतदान पाहता निवडून येण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही. 

ते म्हणाले, ‘‘ पुण्यासह सर्वच जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांदा लावून कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्याचाच परिणाम म्हणून मतदानाची टक्केवारी विक्रमी होऊ शकली आहे. वाढलेल्या या मतदानाचा फायदा मलाच होणार असून मोठ्या मतांच्या फरकाने निवडून येणार आहे.’’

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख