कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण पेटू लागले आहे. त्यातच आता एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पश्चिम बंगालचा दाैरा केला. या दौऱ्यात त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्तारुढ तृणमूल काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे.
#Farmers Protest : तोडगा निघणार का तिढा कायम राहणार..आज बैठक https://t.co/KoiYPuK7if
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 4, 2021
ओवैसी यांनी हुगळी जिल्ह्यातील बंगाली मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या फुरफुरा शरीफचे धार्मिक नेते अब्बास सिद्दीकी यांची भेट घेतली आणि राज्यात त्यांच्या पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा होण्याची गळ घातली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एआयएमआयएम पक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, त्यांचा पक्ष सर्व बाबींमध्ये अब्बास सिद्दीकी यांना पूर्ण पाठिंबा देईल. 'आम्ही त्याच्याबरोबर जाऊ सिद्दीकी आणि आम्ही निवडणूक लढवू. आम्ही किती जागा व कोठे निवडणूक लढवू, हे येत्या काही महिन्यांत निश्चित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
अब्बास सिद्दीकी ममता बॅनर्जी सरकारचे विरोधक आहेत. त्यांचा असा दावा आहे की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस मतांसाठी मुस्लिमांचे शोषण करते. अब्बास फुरफुरा शरीफचे प्रमुख धार्मिक नेते तोहा सिद्दीकी यांचे पुतणे आहेत. मात्र, तृणमूल काँग्रेसचा तोहा सिद्दीकी यांना पाठिंबा आहे, त्यामुळेच असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या दौर्यात तोहा सिद्दिकी यांची भेट घेतली नाही.
ओवैसी यांना वाटते की हुगळी आणि मालदा, मुर्शिदाबाद आणि दिनजपूर अशा इतर जिल्ह्यांमध्ये अब्बास सिद्दिकी आपल्या पक्षाला मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे असदुद्दीन ओवैसी यांनी काही दिवसा पूर्वी म्हटले होते की, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षावर आरोप करण्याऐवजी स्वत: चे आत्मपरीक्षण केले पाहिजेत आणि राज्यात भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या 18 जागा कशा जिंकल्या हे पाहिले पाहिजे. आपला पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे आमच्या पक्षाची ताकत आम्ही दाखवून देणारच.

