मतदानाची वाढलेली टक्केवारी माझ्या विजयासाठीच : अरूण लाड - Arun Lad I will win by a big margin only because of the increased turnout | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

मतदानाची वाढलेली टक्केवारी माझ्या विजयासाठीच : अरूण लाड

उमेश घोंगडे 
बुधवार, 2 डिसेंबर 2020

वाढलेल्या मतदानामुळेच मी मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होईन," असा विश्‍वास  अरूण लाड यांनी व्यक्त केला.

पुणे :  "पुण्यासह पाचही जिल्ह्यात झालेले विक्रमी मतदान माझ्या विजयाची नांदी आहे. या वाढलेल्या मतदानामुळेच मी मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होईन," असा विश्‍वास महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांनी आज ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केला.

आजपर्यंतच्या पदवीधरच्या निवडणुकीतील सर्व निवडणुकांचे विक्रम मोडीत काढत यावेळी पुणे मतदारसंघात तब्बल ५८ टक्के मतदान झाले. मतदारसंघात सर्वाधिक मतदान कोल्हापूरला ६८ टक्के तर सांगलीत ६५ टक्के मतदान झाले. सोलापूर जिल्ह्यात ६२ तर साताऱ्यात ५८ व पुण्यात ४५ टक्के मतदान झाले. गेल्यावेळच्या तुलनेत सरासरीच्या तिप्पट मतदान झाल्याने अमूक उमेदवार निवडून येईल, असे कोडीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.मात्र, लाड यांनी विजयाचा दावा केला असून झालेले मतदान पाहता निवडून येण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही. 

ते म्हणाले, ‘‘ पुण्यासह सर्वच जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांदा लावून कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्याचाच परिणाम म्हणून मतदानाची टक्केवारी विक्रमी होऊ शकली आहे. वाढलेल्या या मतदानाचा फायदा मलाच होणार असून मोठ्या मतांच्या फरकाने निवडून येणार आहे.’’

मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदान झाले. सर्वत्र कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदान करून घेण्यासाठी झटक असल्याचे दिसले. वास्तविक पदवीधरच्या याआधीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कधीच इतके उत्साहाने काम करताना दिसले नव्हते. भाजपाने नियोजनपूर्वक केलेली पदवीधर मतदार नोंदणी व प्रत्यक्ष मतदानातील नियोजन तसेच डॉ. श्रीमंत कोकाटे, रूपाली पाटील, निता ढमाले, निशा बिडवे या मनसेच तसेच अपक्षांनी निवडणुकीतील प्रचारात चांगलीच रंगत आणली होती. त्याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला आहे. उद्या (ता. ३) मतमोजणी होणार असून वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्थ्यावर पडली हे स्पष्ट होणार आहे.

आमचाच उमेदवार विजयी होणार...भाजप, राष्ट्रवादी आशावादी

पिंपरी : "पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाने नोंदणी केलेल्यापैकी पन्नास टक्के मतदान झाल्याने पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा भाजपचे शहर निरीक्षक आमदार निरंजन डावखरे यांनी आज ' सरकारनामा'शी बोलताना केला. तर, मतदारसंघाच्या ग्रामीण भागात शहरापेक्षा जास्त मतदान झाल्याने पदवीधरमध्ये आघाडीचा उमेदवार बाजी मारेल," असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस फजल शेख यांनी केला आहे.

दरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्यात मतदान गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांपैकी (३,२००)फक्त दहा टक्के जणांनी मतदान केले. तर शहरात मतदान असलेल्या पुण्यातील नऊ हजार मतदारांपैकी बहुतांश  न आल्याने अपेक्षित
मतदानाचा टप्पा गाठता आला नाही. तरीही यावेळच्या उद्योगनगरीतील मतदानात वाढ झाली आहे. कारण, मतदानासाठी मतदारांची ने - आण करण्यासाठी रिक्षांसह मोटारींची व्यवस्था करण्यात आली होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख