गोस्वामी यांना अटक, चौथ्या स्तंभावर हल्ला नाही..कोणी गळे काढण्याची गरज नाही...  - Arnab Goswami's arrest is not an attack on the fourth pillar..Not related to journalism | Politics Marathi News - Sarkarnama

गोस्वामी यांना अटक, चौथ्या स्तंभावर हल्ला नाही..कोणी गळे काढण्याची गरज नाही... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

अर्णब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही," असे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.  

पुणे : "रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे.. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे अर्णब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही," असे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.  

एस. एम. देशमुख म्हणाले की मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती, पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते.

गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता, पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प़करणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प़करण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली.

"या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही, दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरूण वाट्टेल तसे उद्योग करणारयांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही. कायद्याला त्याचे काम करू द्यावे हेच उचित ठरेल. अर्णब गोस्वामी यांनी पत्रकारितेचे सर्व संकेत पायदळी तुडवले असून पत्रकारिता कशी नसावी, याचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे. त्यांची पत्रकारिता समर्थनीय नाही," असे देशमुख यांनी म्हटलं आहे.  

अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सीआयडीने त्यांच्या निवासस्थानी अटक केली आहे. आज सकाळीच सुमारे डझनभर पोलिस अर्णब यांच्या निवासस्थानी गेले. तेथून त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीने केला आहे. 

२०१८ मध्ये इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातुश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 
 Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख