अण्णा, दिल्लीत या अन्‌ जनआंदोलनात सहभागी व्हा ! भाजपची विनंती  - Anna, join this people's movement in Delhi! BJP's request | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णा, दिल्लीत या अन्‌ जनआंदोलनात सहभागी व्हा ! भाजपची विनंती 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

दिल्लीतील आप सरकारने भ्रष्टाचाराच आघाडी घेतली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे असल्याची टीका भाजपने केली

नवी दिल्ली /नगर : अण्णा, आपण दिल्लीत या आणि आम आदमी पक्षाविरोधात आवाज बुलंद करा. भाजपच्या जनआंदोलनात सहभागी व्हा अशी विनंती दिल्ली भाजपने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे केली आहे. 

राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे सरकार आहे. येथे आपची सत्ता आणण्यात अण्णा हजारे यांचाही सिंहाचा वाटा आहे. खुद्द केजरीवाल हे दिल्लीतील अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. एकेकाळी हजारे आणि केजरीवाल यांचे संबध सलोख्याचे होते. पुढे मात्र केजरीवाल अण्णांपासून काहीसे दूर गेल्याचे चित्र होते. 

दिल्लीतील आप सरकारने भ्रष्टाचाराच आघाडी घेतली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे असल्याची टीका भाजपने केली असून दिल्लीकरांना न्याय देण्यासाठी आप सरकारविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटले आहे. 

गुप्ता यांनी काल (सोमवारी) हजारे यांना पत्र पाठवून दिल्लीतील आप सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी दिल्लीत येण्याची विनंती केली आहे. 

या पत्रात गुप्ता यांनी म्हटले आहे, की दिल्लीतील केजरीवाल सरकारने राजकीय शुद्धतेचे सर्व मापदंड पायदळी तुडविले आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत जो हिंसाचार झाला त्यालाही हे सरकारच जबाबदार होते. या हिंसाचारात पन्नासहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. तर दोनशेजण जखमी झाले होते. स्वच्छ आणि निपक्ष राजकारणाचा दावा करून सत्तेवर आलेल्या आपने लोकांची पार निराशा केली असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. 

आम आदमी पक्षाचे नवे नाव सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भ्रष्टाचार असे आहे असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले असून अण्णांनी दिल्लीत येऊन या सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा अशी विनंती गुप्ता यांनी केली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख