उर्मिला मातोंडकरबाबत अनिल परब म्हणाले ....  - Anil Parab said Urmila name is not in our discussion. We will send a proposal and see what happens next.   | Politics Marathi News - Sarkarnama

उर्मिला मातोंडकरबाबत अनिल परब म्हणाले .... 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

"उर्मिलाचे नाव आमच्याकडे चर्चेत नाही, प्रस्ताव पाठवू, त्यानंतर काय होतंय ते पाहू," परब यांच्या या विधानानंतर उर्मिलाच्या नावाबाबत त्यांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे उर्मिलाचे नाव मागे पडले की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. 

मुंबई : "राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत नावे कोणती, ही चव्हाट्यावर बसून चर्चा करायची ही नावे नाहीत. राज्य सरकार काळजीपूर्वक नाव देत आहे. याबाबत कॅबिनेटनं ठराव केला आहे. स्थगिती देण्याचा अधिकार कुणाला आहे, असं वाटत नाही," असे शिवसेनेचे नेते, परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. 

उर्मिला मातोंडकरच्या नावाबाबत चर्चा आहे, याबाबत पत्रकारांशी बोलताना अनिल परब म्हणाले, "उर्मिलाचे नाव आमच्याकडे चर्चेत नाही, प्रस्ताव पाठवू, त्यानंतर काय होतंय ते पाहू," परब यांच्या या विधानानंतर उर्मिलाच्या नावाबाबत त्यांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे उर्मिलाचे नाव मागे पडले की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर शिवसेनेत जाणार असून त्यांचे नाव शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त कोट्यासाठी पाठविले जाणार असल्याचे बोलले जात आहे, उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. गेल्या काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर सामाजिक विषयांवर खूप आक्रमक भूमीका मांडत आहेत. महाराष्ट्र, मुंबई यावरही त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे.

अनिल परब यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की आरोप करायचे एवढे एकच काम किरीय सोमय्यांचे आहे. भाजपही त्यांना सिरियसली घेत नाही. भाजपनं सध्या कशावरच राजकारण करू नये, रेल्वे सुरू करण्यासंदर्भात केंद्र काय निर्णय घेतंय ते पाहणे गरजेचे आहे. 

अनिल परब म्हणाले, "कोरोनामध्ये एसटी उत्पन्न बुडाले आहे, एसटी तोट्यात आहे. एसटी सुरू ठेवणं सरकारचे कर्तव्य आहे. कामगारांचेही पगार झालेले नाहीत. त्यांचे पगार, एसटी सुरू ठेवण्याचा किमान खर्च यासाठी सरकारकडे ३६०० कोटी मागितले आहेत. तसंच बाहेरून पैसे उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्मचाऱ्याचे तीन महिन्यांचे पगार थकलेत आहेत. ९०० कोटी रूपये पगारासाठी आवश्यक आहेत. एकूण साडेपाच हजार कोटींचा तोटा आहे एसटीला झाला आहे.  मालवाहतुकीसाठी गाड्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत टायर रिमोल्ड किंवा बॉडी बिल्डींग ( गाड्या बांधणे) या फक्त एसटीसाठी करत आलो आहे. आता आम्ही बाहेरचे कामही घेणार आहोत."

मुंबईत भेंडीबाजार येथे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो रस्त्यावर लावून निषेध करणाऱ्या रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत व रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणी सध्या होत आहे. याबाबत परब म्हणाले की निदर्शने करण्याचा अधिकार आहे. त्यातून धार्मिक तेढ निर्माण होवू नये. रझा अकादमीवरील बंदीबाबत मुंबई पोलिस निर्णय घेतील, असे अनिल परब यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 
Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख