वॉरंटशिवाय राणेंना अटक; या नाट्याचे खरे सूत्रधार अनिल परबच!

राणे हे घरात बसले आहेत, पोलिस त्यांना ओढून बाहेर काढत आहेत. पण, राणे (फोनवर नाव न घेता) त्याला विरोध करत आहेत, असेही त्यांनी शेजारी बसलेल्या सामंत आणि जाधवांना सांगितले.
Anil Parab gives instructions to SP for Narayan Rane's arrest
Anil Parab gives instructions to SP for Narayan Rane's arrest

संगमेश्वर : जनआशीर्वाद यात्रा घेऊन संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज तेथेच अटक करण्यात आली. सुमारे दीड तासाहून अधिक काळ हे अटक नाट्य रंगले होते. वॉरंटशिवाय नारायण राणेंना अटक करण्याच्या नाट्याचे खरे सूत्रधार अनिल परबच आहेत, हे पुढे आले आहे. (Anil Parab gives instructions to SP for Narayan Rane's arrest)

वॉरंटशिवाय अटक करण्याच्या पोलिस कारवाईवर नारायण राणे यांनी आक्षेप घेतल्यामुळे रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक गर्ग यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी परब हे डीपीडीसीच्या बैठकीत होते, त्यांच्या शेजारी आमदार भास्कर जाधव आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बसले होते. पोलिस अधीक्षकांशी परब यांची चर्चा सुरू असतानाच जाधव यांनी ‘राणे यांचा जामीन अर्ज सत्र व उच्च न्यायालयाने फेटाळला आहे,’ असे परब यांना सांगितले. राणेंनी अटक वॉरंटची मागणी केल्याचे अधीक्षकांनी सांगितल्यानंतर परब म्हणाले की, ‘न्यायालयाने जामीन नाकारल्याने आणखी वॉरंटची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही पोलिस फोर्स वापरून अटकेची कारवाई करा.’ त्याच वेळी त्यांनी राणे हे घरात बसले आहेत, पोलिस त्यांना ओढून बाहेर काढत आहेत. पण, राणे (फोनवर नाव न घेता) त्याला विरोध करत आहेत, असेही त्यांनी शेजारी बसलेल्या सामंत आणि जाधवांना सांगितले. संभाषण संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राणेंच्या अटकेबाबत विचारले असते, ‘त्याबाबत मला काही माहिती नाही. गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाला आहे. मी तर रत्नागिरीत बसलो आहे, चला, असे सांगून ते निघून गेले.   

गोळवली येथील कार्यक्रम आटोपून अल्पोपाहार सुरू असतानाच अचानक जिल्हा पोलिस अधीक्षक गर्ग स्वतः आपल्या ताफ्यासह गोळवली येथे दाखल झाले. यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नाशिकला जाईपर्यंत अटक होऊ नये, अशी मागणी करणारा राणे यांनी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर तातडीने सूत्रे हलवत मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या वतीने धाव घेण्यात आली. तोपर्यंत अल्पोपाहार आटोपून कोर्टाचा निर्णय होईपर्यंत इथून हलायचे नाही, असा निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पस्थळी प्रचंड पोलिस फौजफाटा उपस्थित होता.

याच दरम्यान भाजपचे प्रभारी प्रमोद जठार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अटक वॉरंट नसतानाही पोलिस जबरदस्ती करीत आहेत, अटक वॉरंट दाखवा, आम्ही गाडीत बसायला तयार आहोत, असे सांगितले. यानंतर काही वेळातच पोलिस अधीक्षक आणि खुद्द राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटपर्यंत राणे यांना अटक वॉरंट दाखवण्यात आले नाही. त्यांना तसेच त्यांच्या गाडीत घालून संगमेश्‍वर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथून त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

दुपारी साडेबारा वाजता राणेंची यात्रा तालुक्यातील गोळवली येथील गोळवलकर गुरुजी प्रकल्पस्थळात पोचताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. येथील विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यानंतर संघाच्या तालुका आणि जिल्हा समितीच्या पदाधिकारी व सेवकांशी चर्चा केली. त्यांच्या हस्ते कारसेवक, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर अल्पोपाहार करून राणेंचा ताफा संगमेश्‍वरकडे रवाना होण्यापूर्वी हे अटक नाट्य रंगले.

...म्हणून राणेंच्या अटकेसाठी गोळवली निवडलं

गोळवलीतील ज्या विकासप्रकल्पाच्या ठिकाणी नारायण राणे उपस्थित होते, तो परिसर मुख्य रस्त्यापासून एका किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. या गोळवलकर गुरुजी स्मृती विकास प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी नारायण राणे याठिकाणी उपस्थित होते. हा परिसर मुख्य रस्त्यापासून बराच आत असल्यामुळे कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होणार नाहीत आणि गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल. तसंच एकावेळी एकच गाडी आत येणं शक्य असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे पोलिसांनी ही संधी साधत नारायण राणेंच्या अटकेची कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.
  
पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राणे समर्थक संतापले आहेत. पोलिस आणि राणे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. राणे पुत्रांनीही वडिलांच्या अटकेला विरोध केला. नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी नीलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राणे यांच्या जिवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. नारायण राणे जेवण करत असताना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपही प्रसाद लाड यांनी केली. याविरोधात भाजप कोर्टात जाणार असल्याची प्रसाद लाड यांनी सांगितलं.
 
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचा घटनाक्रम

 ► जनआशीर्वाद यात्रा सोमवारी (ता. 22) चिपळुणात दाखल
 ► सकाळी राणेंच्या अटकेसाठी नाशिकमधून सुत्रं हलली
 ►सकाळी 10.30 वाजता राणेंनी पत्रकारांशी साधला संवाद
 ► सकाळी 11 वाजता मराठा समाजातर्फे राणेंचा सत्कार
► चिपळूणात बहाद्दुर शेख नाका येथे सेना-भाजप आमनेसामने
►अटकपूर्व जामिनीसाठी रत्नागिरी न्यायालयात धाव
►दुपारी 12 च्या दरम्यान मंत्र्यांचा ताफा आरवलीत दाखल
►आरवलीत शिवसेनेकडून निषेधाचे फलक झळकले
► रत्नागिरी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
►उच्च न्यायालयात मागितली दाद; तत्काळ सुनावणीस नकार
►12.15 ला राणेंचा ताफा गोळवलीत दाखल
► गोळवलकर गुरुजींच्या सभागृहात सत्कार कार्यक्रम
►अटकेसाठी स्थानिक पोलिसांचा फौजफाटा
► 2 वाजून 25 मिनिटांनी गोळवलीत राणेंना अटक
► दुपारपर्यंत संगमेश्वर पोलिस ठाण्यात थांबवले
►चार वाजण्याच्या दरम्यान महाड पोलिसांच्या स्वाधिन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com