मोठी बातमी : अनिल देशमुखांची आजही ईडीला हुलकावणी - Anil Deshmukh will not be present at the ED inquiry today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

मोठी बातमी : अनिल देशमुखांची आजही ईडीला हुलकावणी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 जून 2021

देशमुख यांना ईडीने समन्स पाठवून पुन्हा आज चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राण्यासाठी ईडीने समन्स पाठवले होते. त्यानुसाह त्यांना आज मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अनिल देशमुख ईडीसमोर (ED) चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची तयारी देशमुखांनी दाखवली आहे. तसे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑनलाईन आपला जबाब नोंदवणार असल्याचे सांगितले आहे. (Anil Deshmukh will not be present at the ED inquiry today)

मंगळवारी ईडीला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, ''मी जवळपास ७२ वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. तपास करताना आणि जबाब नोंदवताना मी  २५ तास आपल्याशी संवाद साधला आहे. म्हणूनच, आज स्वत: उपस्थित राहणे योग्य नाही. मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत असल्याचे म्हटले आहे. 

हे ही वाचा : अनिल देशमुखांना अटक होईल; सर्व पुरावे EDच्या हाती

ईडीने त्याच्यांसंदर्भात दाखल केलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालाची (ईसीआयआर) प्रत दिल्यानंतर त्यांनी मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये वैयक्तिक उपस्थित राहावे लागेल, असे  स्पष्ट केलेल नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, देशमुख यांना ईडीने समन्स पाठवून पुन्हा आज चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशमुख मंगळवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी शनिवारी (ता. २६ जून) देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, चौकशीचे मुद्दे कळल्यानंतरच उत्तरे देता येतील, अशी भूमिका घेत देशमुखांनी एकप्रकारे ईडीवर कुरघोडी केली होती. 

देशमुख यांच्या वकिलाने शनिवारी (ता. २६ जून) अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली होती. त्यानंतर आज (ता. २८ जून) पुन्हा ईडीने समन्स पाठवून मंगळवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा : शिवसेना आमदार सुहास कांदेंनी दिला चक्क आत्मदहनाचा इशारा

देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. या कंपन्या फक्त कागदोपत्री असून पैसे हस्तांतरणासाठी त्याचा वापर होतोय, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. या कंपनीचे मालक असलेल्या जैन बंधूंचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याने एका व्यक्तीला ही रक्कम पाठवून ट्रस्टमध्ये भरण्यास सांगितल्याचा ईडीचा दावा आहे. बारमालकांकडून घेतलेली ४ कोटी ७० लाखांची रक्कम ती हीच असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवालामार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.

मनी लाँडरिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार करणारे ॲड. तरुण परमार यांचा जबाब सोमवारी (ता. २८ जून) ईडीने नोंदवला. या वेळी त्यांनी काही कागदपत्रेही ईडी कार्यालयात सादर केली. या प्रकरणी ईडीने पुन्हा बोलवल्यास आपण उपस्थित राहून यंत्रणेला सहकार्य करू, असे परमार यांनी सांगितले आहे. 
Edited By - Amol Jaybhaye   

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख