मंदिरे उघडल्याने भाजपचा पिंपरी चिंचवडमध्ये आनंदोत्सव..

श्री मोरया गोसावी समाधी मंदीरात सकाळी महाआरती करण्यात आली.
मंदिरे उघडल्याने भाजपचा पिंपरी चिंचवडमध्ये आनंदोत्सव..
मोरया१६.jpg

पिंपरी : मंदिरे उघडल्याने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपने शहराचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मोरया गोसावी समाधी मंदीरात सकाळी महाआरती करण्यात आली.  

मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनांमुळे राज्य सरकारवर मोठा दबाव येऊन त्यांनी मंदीरे उघडण्यास परवानगी दिल्याचा दावा भाजपने केला आहे. लाँकडाउन शिथिल झाल्यानंतरही राज्यातील मंदिरे अद्याप बंदच होती. दुसरीकडे बार सुरु झाले होते. हाच मुद्दा पकडून ठाकरे सरकारविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन छेडले होते. त्याला त्यांनी बार सुरू आणि मंदिर बंद अशी टँगलाईन दिली होती.  मंदिरं ताबडतोब उघडावीत याकरिता राज्यातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, सर्व धार्मिक संस्था-संघटनांना घेऊन पक्षाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्यव्यापी लाक्षणिक उपोषणे व आंदोलनं केली होती. या संघर्षाचे हे यश आहे, असे पक्षाने म्हटले आहे. 

आजच्या महाआरतीत महापौर माई ढोरे, शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे, प्रदेश सदस्य एकनाथ पवार, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस अँड मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, राजू दुर्गे यांच्यासह नगरसेविका, नगरसेवक, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील झाले होते.

पंढरपुरात मनसे, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव... 
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज दर्शनास खुले झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पंढरपूरात लाडू, पेढे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला . श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोरोना संसर्गामुळे आठ महिने बंद होते. आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन सुरू झाल्यानंतर आनंद साजरा होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश संघटक दिलीप धोत्रे यांनी राज ठाकरे आणि वारकरी मंडळी ची भेट घडवून दिली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुध्दा पंढरपूरात आंदोलन केले होते. तर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतल्याचे स्वागत केले. संत नामदेव पायरी जवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना ,वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी उपस्थित भाविकांना लाडू, पेढा, मिठाईचे वाटप केले. दर्शन सुरू झाल्याचा आनंद सर्वानी व्यक्त केला.  विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना सुध्दा मिठाई भरवली.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in