मला आणि कोल्हेंना लोक म्हणायचे राष्ट्रवादीत कशाला जाताय? : लंके - Amol Kolhe and Me people Ask why You are Joining NCP? : Nilesh Lanke | Politics Marathi News - Sarkarnama

मला आणि कोल्हेंना लोक म्हणायचे राष्ट्रवादीत कशाला जाताय? : लंके

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

ज्या पक्षातून आम्ही राष्ट्रवादीत आलो, त्या पक्षाच्या नेतृत्वालासुद्धा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली

पुणे : "मी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे आम्ही दोघे नशीबवान असल्याने राजकारणात योग्य दिशेने आलो, आम्ही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलोच. पण, ज्या पक्षातून आम्ही राष्ट्रवादीत आलो, त्या पक्षाच्या नेतृत्वालासुद्धा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली,' असे वक्तव्य पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केले. 

बेल्हे ते शिरूर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 761) या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते बेल्हे (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे झाले. त्या कार्यक्रमात आमदार लंके बोलत होते. या महामार्गाचा मोठा भाग लंके यांच्या पारनेर मतदारसंघातून जातो. त्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित होते. 

लंके म्हणाले, मी एकमेव असा आमदार आहे की महाराष्ट्रातील सगळी यंत्रणा माझ्या प्रचाराला लागली होती. तालुक्‍यात अनेक पाव्हण्यांचे फोन यायचे तेवढे नीलेश लंकेचं बघा. मी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे दोघेही नशीबवान आहोत, आम्ही राष्ट्रवादीत आलो. ज्यावेळी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी कोल्हे आणि मलाही अनेक जण म्हणायचे तुम्ही काय निर्णय घेत आहात. तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात. पण, आम्ही चुकीच्या दिशेने जाणार नव्हतो, तर आम्ही योग्य दिशेने गेलो, हे आता सिद्ध झाले आहे. 

आपल्या जुन्या पक्षाबाबत आमदार लंके यांनी सांगितले की शिवसेनेने माझी पक्षातून हकालपट्टी केली. पण, विधानसभेत बहुमत सिद्ध करताना 145 चा आकडा (बहुमताची संख्या) नेमका मीच उच्चारला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सत्कारासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्या वेळी त्यांना म्हणालो की साहेब तुम्ही मला पक्षातून काढलं पण, बहुमताचा आकडा माझ्याच तोंडून उच्चारला गेला. 

राष्ट्रवादी सत्तेत येण्याचे संकेत शिवजन्मभूमीतून 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोणालाही विचारले असते, की सरकार कोणाचे येणार आहे. त्या वेळी त्याने सांगितले असते की शिवसेना-भाजपचेच येणार. पण, पवार साहेबांनी अशी काही जादू केली की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. अतुल बेनके यांच्या जुन्नर तालुक्‍यातील प्रचार सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते की, राज्यातील सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस असणार आहे. आपण सत्तेत येणार आहोत, हे संकेत जुन्नरमधून म्हणजे शिवजन्मभूमीतून मिळाले होते, असे लंके यांनी नमूद केले. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख